Navi Mumbai municipal Corporation | Sarkarnama

नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात 293 कोटींची वाढ

संदीप खांडगेपाटील
बुधवार, 3 मे 2017

मागील वर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रसिध्दी मिळाली. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असल्यामुळे नवी मुंबईकरांना पाण्याची टंचाई कधीही जाणवली नाही. त्यात यंदा उत्पन्नात 300 कोटीची वाढ झाल्याने महापालिकेची तिजोरी सुदृढ झाल्याची प्रतिक्रिया महापालिका अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई : नागरी समस्या निवारणात आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिकेचा नावलौकीक आहे. विविध नागरी सुविधा पुरवूनही 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल 293 कोटी रूपयांची वाढ झाली आहे.

मागील वर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रसिध्दी मिळाली. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असल्यामुळे नवी मुंबईकरांना पाण्याची टंचाई कधीही जाणवली नाही. त्यात यंदा उत्पन्नात 300 कोटीची वाढ झाल्याने महापालिकेची तिजोरी सुदृढ झाल्याची प्रतिक्रिया महापालिका अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विविध करांच्या माध्यमातून महानगरपालिकेस प्राप्त होणार्‍या महसूलामधून नागरी सुविधा पुरविण्यात येत असतात. त्यामुळे स्थानिक संस्था कर व मालमत्ता कर हे महानगरपालिकेचे अत्यंत महत्वाचे विभाग मानले जातात. यावर्षी सन 2016-17 मध्ये स्थानिक संस्था कर विभागाने मागील वर्षाच्या तुलनेत 152 कोटी इतकी वाढ तसेच मालमत्ता कर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत 140 कोटी इतकी मोठ्या प्रमाणावर वाढ महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार या दोन्ही विभागांचे उप आयुक्त उमेश वाघ यांच्या नियंत्रणाखाली केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे.

या निधीचा उपयोग नागरी सुविधांसाठीच खर्च होणार असल्याने याद्वारे नागरिकांनाही अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे पालिका प्रशासनाला आता शक्य होणार आहे.

सन 2015-16 च्या तुलनेत यावर्षी या दोन्ही विभागांनी कर वसुलीसाठी अधिक प्रभावी मोहीमा राबवित तसेच थकीत कर वसूलीवर भर देत तब्बल 300 कोटीहून अधिक रक्कमेची वाढ केल्याने कोणत्याही  महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीचा विचार करता हा वर्षभरातला विक्रम ठरावा. विशेष म्हणजे स्थानिक संस्था कर बंद होऊनही या विभागाने वर्षभरात 152 कोटी इतकी उत्पन्नाची मजल मारल्याने स्थानिक संस्था कर वसुलीचा आकडा सन 2016-17 या वर्षात 1022 कोटी 41 लाख इतक्या मोठ्या पातळीवर पोहचला आहे व हाही एक विक्रमच ठरावा.

स्थानिक संस्था कराची मागील सन 2015-16 वर्षाची वसूली 870 कोटी इतकी होती. ती सन 2016-17 मध्ये 1022 कोटी इतकी झाली असून त्याकरिता या विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांनी प्राधान्याने लक्ष देत थकबाकी वसूलीसाठी विशेष उपाययोजना राबविल्या. ज्यामध्ये 1100 थकबाकीदारांची खाती गोठविण्यात आली. उपकराची (सेस) जूनी 70 कोटी रकमेची वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे जूने व्यापारी शोधून वसूली कऱण्यात आली. या वर्षभरात 16800 निर्धारणा करण्यात आल्या. मागील वर्षीच्या तुलनेत हा निर्धारणांचा आकडा दुप्पटहून अधिक आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक संस्था कराच्या सन 2015 मध्ये शासनाकडून जाहीर झालेल्या अभय योजनेमध्ये 5400 निर्धारणा पूर्ण करण्यात आल्या. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत स्थानिक संस्था करात झालेली 152 कोटींची वाढ ही स्थानिक संस्था कर रद्द झाल्यानंतर झाली आहे हे लक्षात घेणे गरजेचे असून महाराष्ट्र राज्यातील ही स्थानिक संस्था कराची सर्वाधिक वाढ आहे. स्थानिक संस्था कराच्या प्राप्त 1022 कोटी 41 लाख रक्कमेमध्ये 883 कोटी 51 लाख इतकी रक्कम प्रत्यक्ष कर वसूली आणि 138 कोटी 90 लाख इतक्या रक्कमेचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च  2017 या तीन महिन्यांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले आहे.

अशाच प्रकारे मालमत्ता करामध्ये मागील सन 2015-16 वर्षातील 507 कोटी रक्कमेमध्ये या वर्षी सन 2016-17 मध्ये तब्बल 140 कोटी इतकी मोठ्या प्रमाणावर वाढ होत 647 कोटी इतकी मोठी रक्कम मालमत्ता करापोटी जमा झाली आहे. मालमत्ता कराच्या वसूलीसाठी विभागातील अधिकारी - कर्मचारीवृंदाने विशेष मोहीमा हाती घेऊन 65 मालमत्तांवर जप्ती आणलेली आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता कराची देयके विहीत वेळेत वितरण केल्याने देयकांचे वितरण व वसूली सुलभ झालेली आहे. नोटा बंदीच्या काळातही रु.500/- व रु.1000/- च्या जून्या नोटा शासनाने जाहीर केलेल्या 31 डिसेंबर या तारखेपर्यंत कर वसूलीसाठी ग्राह्य धरण्यात येऊन 8 नोव्हे. ते 31 डिसें. 2016 या 53 दिवसात रु.52 कोटी इतकी चांगली वसूली या कालावधीत करण्यात आली.

मागील सन 2015-16 या वर्षात या दोन्ही विभागांचे उत्पन्न 1377 कोटी इतके होते ते यावर्षी सन 2016-17 मध्ये 1670 कोटी इतके झाले आहे. म्हणजेच महापालिकेच्या उत्पन्नात या दोन्ही विभागांनी तब्बल 293 कोटी रक्कमेची विक्रमी वाढ केलेली आहे.

 

संबंधित लेख