Navi mumbai - MLA Narendra Patil takes U-turn on BJP entry | Sarkarnama

भाजप प्रवेशावरून आमदार नरेंद्र पाटील यांची सपशेल शरणागती

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

माथाडी कामगार हा माझा केंद्रबिंदू असून त्याच्या भल्यासाठी मी `वर्षा'वर जात होतो. यात मी काय पाप केले? मी कुठेच जाणार नाही, मी सदैव तुमच्या बाजूलाच असेन अशा शब्दात पाटील यांनी पवार यांच्यासमोर सरळ शरणागती पत्कारली. पत्रकारांनी माझ्या `ध'चा `मा' केला असे बोलून भाजप प्रवेशाच्या बातम्यांचे खापर पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांवर फोडले.

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच गडी कामगाराचा माथाडी कामगार झाला. त्यांनी केंद्रात माथाडी कामगाराची मांडलेल्या सकारात्मक व्याख्येमुळे राज्यात माथाडी कामगार कायदा जन्माला येऊ शकला, अशा भाषेत आमदार नरेंद्र पाटील यांनी पवारांवर स्तूतिसूमने उधळली. 

माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांच्या 84व्या जयंती निमित्त शरद पवार यांच्या सत्काराचे आयोजन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात पाटील यांनी पवारांचे कौतूक करीत स्वतःबद्दल भाजप प्रवेशाच्या बातम्यांचे स्पष्टीकरण दिले.
 
शरद पवार यांनी माथाडी कामगारांसाठी खूप काही केले असून आण्णासाहेबांनी माथाडी कामगारांचे ज्या-ज्या ठिकाणी मेळावे घेतले, त्या-त्या ठिकाणी पवार उपस्थित होते. त्यांच्या या सहकार्यामुळेच कोपरखैरणे येथे माथाडी कामगारांची घरे होऊ शकली, असे कौतूगोद्गार पाटील यांनी काढले. प्रास्ताविकाचे भाषण करताना नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाबद्दल गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न केला. माथाड्यांच्या भल्यासाठी युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांना मेळाव्यात आणले होते. त्याप्रमाणे माथाड्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणले होते. त्या बदल्यात त्यांनी माथाडी कामागारांच्या मूलांचे व घराचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. यात माझे काय चूकले, असे बोलताना पाटील भावनिक झाले होते. 

माथाडी कामगार हा माझा केंद्रबिंदू असून त्याच्या भल्यासाठी मी `वर्षा'वर जात होतो. यात मी काय पाप केले? मी कुठेच जाणार नाही, मी सदैव तुमच्या बाजूलाच असेन अशा शब्दात पाटील यांनी पवार यांच्यासमोर सरळ शरणागती पत्कारली. पत्रकारांनी माझ्या `ध'चा `मा' केला असे बोलून भाजप प्रवेशाच्या बातम्यांचे खापर पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांवर फोडले. याबरोबरच मागील आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी माथाडी कामगारांची कामे केली असती तर आम्हाला दुसऱ्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली नसती असा टोलाही पाटील यांनी लगावला. चव्हाण बाबांना माथाडींची काय चिड आहे माहीत नाही. परंतु ते कधीच माथाडी कामगारांच्या मेळाव्याला आले नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली. 

यावेळी शरद पवार यांच्या हस्ते 17 माथाडी कामगारांना माथाडी भुषण पूरस्कार देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे या कार्यक्रमात फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार होते. मात्र फडणवीस यांना अचानक दिल्लीला जावे लागल्याने त्यांच्यासह भाजपचे मंत्री व आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. 

माझा पोपट झाला 
शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकाच व्यासपिठावर आणून मला माथाडी कामगारांच्या व्यथा दोघांसमोर मांडायच्या होत्या. मात्र आज अचानक मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावे लागल्याने माझा सपशेल पोपट झाला अशी कबूली नरेंद्र पाटील यांनी दिली.

संबंधित लेख