नवी मुंबईकरांच्या दिमतीला कोस्टल रोड! 

नवी मुंबईकरांच्या दिमतीला कोस्टल रोड! 

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील कोस्टल रोडबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तो नवी मुंबईकरांच्या दिमतीला लवकर येण्याची शक्‍यता आहे.

2013 मध्ये महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत ऐरोली- वाशी- उलवे या मार्गावरील उन्नत कोस्टल रोडचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र तत्कालीन आघाडी सरकारने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे तो बासनात गुंडाळावा लागला होता, परंतु उड्डाणपुलांच्या उद्‌घाटन कार्यक्रमात फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवल्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

नवी मुंबईच्या वाढत्या नागरीकरणामुळे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. याशिवाय नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीचे चौथे बंदर व न्हाव्हा-शेवा सी-लिंकमुळे वाहतुकीवर ताण वाढणार आहे. ही सर्व वाहतूक नवी मुंबईतूनच जाणार असल्याने शहरात वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्यादृष्टीने अभियांत्रिकी विभागाने 2014 मध्ये ऐरोली-वाशी-उलवे अशा 28 किलोमीटरच्या उन्नत कोस्टल रोडचा प्रस्ताव तयार केला होता. अभिनव आकार कन्सलटन्सीचे अमोल खैर यांच्याकडून त्याचा आराखडा तयार केला असून सुमारे तीन हजार 800 कोटी इतका या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे. विशेष म्हणजे महापालिकेने हा प्रस्ताव एमएसीझेडएमकडे परवानगीसाठी पाठवला होता. त्याला परवानगीही मिळाली आहे; मात्र तत्कालिन आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे तो धूळ खात पडून होता, परंतु शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी पुन्हा या प्रस्तावाचा पाठपुरावा करून प्रशासनाला त्यावर विचार करणे भाग पाडले आहे.

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलांच्या उद्‌घाटन कार्यक्रमातील भाषणात या कोस्टल रोडच्या प्रस्तावाचा सकारात्मक उल्लेख केला. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आदेश देत तो व्यावहारिक असल्यास करण्यास काहीच हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पालिकेच्या आशा पल्लवित झाल्या असून पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करून हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती शहर अभियंते मोहन डगांवकर यांनी दिली. 

महापालिकेचा कोस्टल रोडचा प्रस्ताव आधीपासून तयार आहे. हा प्रस्ताव पुन्हा एकदा एमएमआरडीएकडे पाठवून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा रोड फार महत्त्वाचा आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com