Navi Mumbai cidco land scam allegations helped Sanjay Nirupam to retain his post | Sarkarnama

संजय निरुपम ठरले नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराचे 'राजकीय' लाभार्थी !

सरकारनामा
मंगळवार, 10 जुलै 2018

 नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराबाबत आक्रमक आवाज उठविताना  संजय निरुपम यांनी  जे टायमिंग साधले त्यामुळे  मुंबईतील काँग्रेसचे अनेक नेते हैराण झाले आहेत .

मुंबई : कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकाअर्जुन खर्गे यांनी  मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना अभय दिले आहे .  संजय निरुपम यांचे अध्यक्षपद  नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराबाबत त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे  टिकले अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा आहे . 

 नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराबाबत आक्रमक आवाज उठविताना  संजय निरुपम यांनी  जे टायमिंग साधले त्यामुळे  मुंबईतील काँग्रेसचे अनेक नेते हैराण झाले आहेत . मूळचे पत्रकार असलेल्या संजय निरुपम यांना शिवसेनेतील अनुभव देखील अशा कठीण प्रसंगात कामाला येतो अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा  आहे . 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत संजय निरुपम यांच्या एककल्ली कारभारावर नाराज असल्याचे बोलले जाते .  गुरुदास कामत यांनी संजय निरुपम  यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून दूर करावे अशी भावना हायकमांड पर्यंत पोहोचवली असल्याचे समजते . माजी मंत्री कृपाशंकर सिंग हे देखील संजय निरुपम यांना हटवण्याबाबत आग्रही होते आणि त्यांनी तसे श्री. खर्गे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे सांगितले जाते . 

संजय निरुपम यांनी मात्र मुंबईतून  आपण एकटेच  सरकारविरोधात लढत आहोत , असा सूर श्री. खर्गे यांचेकडे लावला असे समजते . एवढेच नव्हे तर  श्री निरुपम  यांनी  यांनी नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहारासंदर्भातील सर्व कागदपत्रे जाहीर कार्यक्रमात  खर्गे यांच्याकडे सोपवली आणि लोकसभेत या प्रश्नावर आवाज उठवावा असते आवाहन त्यांनी खर्गे यांना केले . 

प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेतेही संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे समजते . पण संजय निरुपम यांनी याच काळात  नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराचे प्रकरण  उपस्थित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेऊन आरोप केले . त्यामुळे सरकारविरुद्ध आणि मुख्यमंत्र्याविरुद्ध संजय निरुपम आक्रमक असल्याचा मेसेज गेला . अशा परिस्थिती संजय निरुपम यांना अध्यक्ष पदावरून दूर केले असते तर मुंबईत आणि राज्यात चुकीचा संदेश गेला असता . 

त्यामुळे  नवी मुंबईतील सिडको गैरव्यवहाराचे चौकशी अंती जे व्हायचे ते होईल पण आजघडीला तरी  मुंबईतील सिडको गैरव्यवहाराचे संजय निरुपम 'राजकीय' लाभार्थी ' ठरले असून त्याचे स्थान भक्कम झाले आहे .  

संबंधित लेख