navi mumbai-ashwini-gore-bidre-murder-investigation | Sarkarnama

अश्‍विनी गोरे-बिद्रे यांच्या शरीराच्या तुकड्यांचा शोध पाणबुड्यांनी घेणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे ज्या पेटीत टाकून नदीत फेकण्यात आले, त्या पेटीच्या शोधासाठी पोलिस पाणबुडे व वॉटरप्रुफ कॅमेऱ्यांची मदत घेणार आहेत. 

नवी मुंबई : पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे ज्या पेटीत टाकून नदीत फेकण्यात आले, त्या पेटीच्या शोधासाठी पोलिस पाणबुडे व वॉटरप्रुफ कॅमेऱ्यांची मदत घेणार आहेत. 

तपासादरम्यान कुणीही नदी परिसरात फिरकू नये किंवा कुणाला काही सापडते का, यावर नजर ठेवण्यासाठी तेथे बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा खून केल्याची कबुली यातील संशयित महेश फळणीकर याने दिल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी पनवेल न्यायालयात दिली. कुरुंदकर याच्या भाईंदर येथील भाड्याच्या घरात लाकूड कापण्याच्या कटरने खून करून बिद्रे यांच्या शरीराचे तुकडे वसईतील नदीत टाकल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या चौघांवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

बिद्रे यांचे अपहरण केल्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याला 7 डिसेंबर 2017 ला अटक केली. त्याला मदत केल्याच्या आरोपावरून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटीललाही 10 डिसेंबरला अटक केली. चौकशीत या दोघांकडून फारशी माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्टची मागणी केली होती; मात्र त्यांनी त्यास नकार दिला होता. 

दरम्यानच्या कालावधीत मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे पोलिसांनी कुरुंदकरचा चालक कुंदन भंडारी याला अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कुरुंदकरचा मित्र फळणीकर याला पुण्यातून अटक झाली होती. 

ज्या दिवशी बिद्रे भाईंदर येथून बेपत्ता झाल्या; त्या दिवशी मध्यरात्री कुरुंदकर आणि भंडारीच्या मोबाईलचे लोकेशन त्याच परिसरात असल्याचे तपासात आढळले होते. बिद्रे बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुरुंदकरने भंडारीच्या माध्यमातून आपल्या घरात रंगकाम केल्याची माहिती तेथे रंगकाम करणाऱ्या संजय सुराडकर याने पोलिसांना दिली होती. 

दरम्यान, भंडारीला 5 मार्च, तर फळणीकरला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांकडे सबळ पुरावे नसल्याचा दावा आरोपींचे वकील ऍड. आर. आर. पाटील यांनी केला आहे. 

संबंधित लेख