नाशिक जिल्हा परिषद सत्ताकारणात शिवसेना-काँग्रेस आघाडीची बाजी अध्यक्षपदी शितल सांगळे अन्‌ उपाध्यक्षपदी नयना गावीत

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीने भाजपच्या साथीने कॉंग्रेसला अध्यक्षपदाची "ऑफर' दिली होती. पण ही "ऑफर' धुडकावून लावत सत्ताकारणात शिवसेनेसोबत जुळलेले सूत कॉंग्रेसने कायम ठेवले.
नाशिक जिल्हा परिषद सत्ताकारणात शिवसेना-काँग्रेस आघाडीची बाजी अध्यक्षपदी शितल सांगळे अन्‌ उपाध्यक्षपदी नयना गावीत

नाशिक - राज्याच्या राजकारणात युतीसह आघाडीत झालेल्या फाटाफुटीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आघाडीने राष्ट्रवादी-भाजप आघाडीवर मात केली. शिवसेनेच्या शितल उदय सांगळे या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावीत विजयी झाल्या आहेत.

अटीतटीच्या लढतीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन आणि एका अपक्षाच्या जोरावर शिवसेना-कॉंग्रेसने राष्ट्रवादी-भाजपला कसाऱ्याचा घाट दाखवला. जिल्हा परिषदेच्या मागील अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने परंपरागत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर सारत शिवसेना-भाजपसह सत्ता काबीज केली होती. ही धोबीपछाड विसरुन काँग्रेसने काही तालुक्‍यात राष्ट्रवादीशी जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी केली.

पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना बंधूंचा पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीने भाजपच्या साथीने कॉंग्रेसला अध्यक्षपदाची "ऑफर' दिली होती. पण ही "ऑफर' धुडकावून लावत सत्ताकारणात शिवसेनेसोबत जुळलेले सूत कॉंग्रेसने कायम ठेवले.

विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिक सोडताच, काल (ता. 20) काँग्रेसचे निरीक्षक आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नाशिकमध्ये दाखल झाले आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसमवेत जाण्याबद्दल घेतलेला निर्णय कॉंग्रेसच्या गोटात धडकला. अशातच, भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, माजी आमदार ऍड्‌. माणिकराव कोकाटे, आमदार डॉ. राहूल आहेर, माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी श्री. रघुवंशी यांच्याशी शासकीय विश्रामगृहात केलेली चर्चा फलद्रुप ठरली नाही.

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 35 मते मिळाली. सौ. सांगळे यांना 37 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना 35 आणि कॉंग्रेसच्या गावीत यांना 37 मते मिळाली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रमेश बरफ हे दोन्ही निवडणुकीत तटस्थ राहिले. या निकालानंतर फटाक्‍यांचा आतषबाजी करत भगवा रंग उधळण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा-उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कल स्पष्ट होत नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन हे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना नाशिकमध्ये थांबवून जळगावकडे रवाना झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com