13 वर्षांच्या मुलाला दिले महापालिकेचे घर

सरकारी योजनेत राजकारण्यांचा हस्तक्षेप झाला की, काय व कसा घोटाळा होईल याचा नेम नाही. महापालिकेच्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या एका प्रकल्पात 78 बनावट लाभार्थ्यांना घरे मिळाल्याचे उघड झाले आहे. थेट टोलेजंग बंगल्यात राहणाऱ्या एका नगरसेवकाच्या मातुश्री यात लाभार्थी आहेत. एव्हढेच नव्हे तर खुद्द झोपडपट्टी निर्मूलन अधिकाऱ्याच्या तेरा वर्षाच्या नातवालाही घर देण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधींचा हा घोटाळा अचानक प्रकाशझोतात आला आहे.
13 वर्षांच्या मुलाला दिले महापालिकेचे घर

नाशिक : सरकारी योजनेत राजकारण्यांचा हस्तक्षेप झाला की, काय व कसा घोटाळा होईल याचा नेम नाही. महापालिकेच्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या एका प्रकल्पात 78 बनावट लाभार्थ्यांना घरे मिळाल्याचे उघड झाले आहे. थेट टोलेजंग बंगल्यात राहणाऱ्या एका नगरसेवकाच्या मातुश्री यात लाभार्थी आहेत. एव्हढेच नव्हे तर खुद्द झोपडपट्टी निर्मूलन अधिकाऱ्याच्या तेरा वर्षाच्या नातवालाही घर देण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधींचा हा घोटाळा अचानक प्रकाशझोतात आला आहे.

शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी, झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळावी म्हणून महापालिकाने पंतप्रधान आवास योजनेत भारत नगरला 620 सदनिकांच्या चार इमारती बांधल्या. मात्र, सदनिकांत लोक रहायला गेले तरी झोपडपट्टी मात्र तशीच राहिली. या सदनिकांमध्ये झोपडपट्टीवासीयांऐवजी बंगल्यांत राहणारे नगरसेवक आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांचे नातलगच लाभधारी बनले. 'झोपडपट्टीवासी बेघर...नगरसेवक झाले लाभधारक', अशी येथील स्थिती आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागाचे झोपडपट्टी निर्मूलन अधिकारी बागूल यांच्या प्रथमेश राजेश शिंदे या तेरा वर्षाच्या मुलाला मोफत सदनिका देण्यात आली आहे. यादीत त्याची पालक म्हणून आई माधुरी राजेश शिंदे यांचेही नाव आहे.

शहरातील वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टीचे पुर्नवसन करण्यासाठी महापालिकेने ही योजना राबविली. त्यासाठी परिसरात चार वेळा अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवून रस्त्यातील अडथळा असलेल्या झोपड्या व पूररेषेतील झोपड्या हटविल्या. त्यात राहणाऱ्यांचे पंचनामे केले. मात्र, पुर्नवसनासाठी जी यादी तयार झाली त्यातील नावे भलतीच निघाली. ज्या प्रभागात झोपडपट्टी आहे तेथील सर्व नगरसेवक भाजपचे आहेत बहुदा योगायोग असावा. झोपडपट्टीत राहणारे निराधारच राहिले. मात्र, लाभधारकांच्या यादीत याच भागात बंगल्यात वास्तव्य करणाऱ्या नगरसेविका रुपाली निकुळे व त्यांचे पती माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या मातुःश्री मुक्ता केशव निकुळे (लोकवास क्र. 66) यांना घर मिळाले. लहान भाऊ जगन केशव निकुळे (ए2-48) यांना 2016 मध्ये घर मिळाले. मावसबहिण भारती वसंत जोशी, शिवाय तिचे दीर मनोहर रमेश जोशी, चंद्रकांत रमेश जोशी आणि विजय रमेश जोशी हे सर्व लाभार्थी आहेत.

बोधले नगर येथे प्रशस्त सदनिकेत राहणाऱ्या माजी नगरसेविका माधुरी मिलींद जाधव यांच्या सासुबाई रत्नाबाई संपत जाधव यांना याच योजनेत घर मिळाले आहे. बेघरांच्या यादीत हे लोक कसे आले अशी तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याशिवाय पाणीपुरवठा अधिकारी अजीज अब्दुल गनी शेख यांच्या नातेवाईक हुस्ना अजीज शेख, शाहीन अजीज शेख हे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट झाले. ही नावे खरी की बनावट याचा अपवाद केला तरीही जे बेघर झाले ते मुळ लोक बेघर राहिले. ज्यांची आधीच उत्तम घरे आहेत त्यांच्याशी संबंधितांना घरे मिळाली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे महापालिकेच्या या योजनेलाच हरताळ फासला गेला आहे. यातील दोषींवर कारवाई होणार का? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.

लाभार्थी म्हणतात.....

''लाभार्थी ठरविण्याची प्रक्रीया महापालिका प्रशासन करते. मी जरी बंगल्यात राहतो तरीही आमचे कुटुंब पूर्वी त्याच भागात रहात होते. त्यामुळे नियमानुसार माझ्या आई व भावाला सदनिका मिळाल्या आहेत. मी नगरसेवक असतांना अथवा माझी पत्नी नगरसेविका असल्याने आम्ही कुठेही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही.''- माजी नगरसेवक यशवंत निकुळे, भाजप नेते.

''माझी सुन माधुरी मिलींद जाधव नगरसेविका आहे. मात्र त्यामुळे महापालिकेचे घर मिळाले नाही. आम्ही पूर्वी भारत नगरला रहात होतो. त्याच्या पावत्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे माझ्या पत्नीला सदनिका मिळाली आहे. सध्याची तक्रार राजकीय हेतूने केलेली आहे.''- संपत जाधव, ज्येष्ठ नेते, भाजपा.

सरकारनामाच्या अन्य बातम्या -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com