nashik scam | Sarkarnama

नाशिकमधल्या अभियंत्यांच्या मालमत्तेची मोदींकडून चौकशी होणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जून 2017

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधूग्रामच्या कंत्राटावरुन निर्माण झालेला वाद महापालिकेच्या दोन अभियंत्यांच्या मुळावर आला आहे. या वादातून एकाने शहर अभियंत्यांसह दोन अभियंत्यांच्या मालमत्तेची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन पोर्टलवर केल्याने या अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. यातून घबाड हाती लागते की डोंगर पोखरून उंदीर निघतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधूग्रामच्या कंत्राटावरुन निर्माण झालेला वाद महापालिकेच्या दोन अभियंत्यांच्या मुळावर आला आहे. या वादातून एकाने शहर अभियंत्यांसह दोन अभियंत्यांच्या मालमत्तेची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन पोर्टलवर केल्याने या अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. यातून घबाड हाती लागते की डोंगर पोखरून उंदीर निघतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पध्दत व गैरकारभाराला दणका देत सफाई मोहीम राबविणाऱ्या आयुक्त कृष्णा यांना दोन दिवसांपूर्वी आणखी एक प्रकरण आयतेच हाती आले. शहरातील भाजपचे कार्यकर्ते नरेश नाईक यांनी महापालिकेतील शहर अभियंता यु. बी. पवार आणि कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांनी जमा केलेल्या बेहिशेबी तसेच मोठ्या प्रमाणातील मालमत्तेचा तपशील देत प्रशासनात मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरु आहे. त्यातून ही संपत्ती निर्माण केल्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन पोर्टलवर केली होती. त्याची दखल घेऊन ती आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली. थेट दिल्लीहून तक्रार आल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. अन्यथा पालिकेच्या विविध अभियंत्यांबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या होत्या. त्यातून फारसे काही हाती लागले नव्हते. कारण तो फार्स ठरला होता. आताच्या तक्रारीवरुन मात्र अनेक अभियंत्यांच्या कार्यपध्दती व तक्रारींचीही चर्चा आहे. 

शहर अभियंता यु. बी. पवार यांचे उच्चभ्रू वस्तीत भूखंड, गोदावरी नदीलगत जमिनी आहेत. पगारे यांनी सिडकोत सपना सिनेमागृहालगत दोन भूखंड खरेदी केले आहे. त्याचे व्यवहार संशयास्पद असल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. याशिवाय यापूर्वी शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या 202 कोटींच्या प्रकरणात गैरव्यावहार करुन ही प्रक्रिया नियमबाह्य पध्दतीने ठेकेदारांच्या सोयीची केल्याने कार्यकारी अभियंता नारायण आगरकर यांच्याविरोधात प्रशासकीय कारवाई सुरु झाली होती. अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी खासगी संस्थांना ना हरकत दाखला देतांना नियमात तरतुद नसतांना विविध सक्ती करीत त्यात पैसे मागितल्याचा आरोप आहे. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. महापालिकेच्या खतप्रकल्पात साठ कोटींची यंत्रणा बसवितांना त्यात घोटाळा केल्याचा ठपका स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांच्यावर आहे. घोटाळ्यांची ही यादी खुपच मोठी आहे. मात्र पहिल्यांदाच त्यावर गांभिर्याने चौकशी सुरु झालीय. 
शहर अभियंता पवार हे "मनसे'च्या कार्यकाळातील महापौर ऍड यतीन वाघ यांचे मेहुणे आहेत. महापालिकेच्या बहुतांशी निविदा तसेच अन्य महत्वाच्या कामांचे निर्णय वाघ महापौर झाल्यावर त्यांच्याकडे एकवटले होते. 
पंतप्रधानांच्या ऑनलाईन पोर्टलकडून तक्रार आल्याने त्याची चौकशी करुन पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठविला जाईल असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी यासंदर्भात सांगितले. 

संबंधित लेख