Nashik politics three MLAs against wine shop | Sarkarnama

नाशिकात दारु दुकानाच्या स्थलांतरावरून तीन आमदार आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जुंपली

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 जुलै 2017

"दारु दुकानाला लोकांचा विरोध लक्षात घेता प्रशासनाने कायदा- सुव्यवस्था बिगडू नये म्हणून त्याची दखल घ्यावी. आता पालकमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे.'

- आमदार बाळासाहेब सानप,  भाजप. 

-------------------------------------------
... 
"नागरी वस्तीत दारु दुकान सुरु करणे गैर आहे. महिला, मुलांसह सगळे विरोध करीत असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. प्रशासनाने मात्र त्याचा विचार केलेला नाही.'

- नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, गटनेत्या, कॉंग्रेस. 

--------------------------------------------------------
...
"दिंडोरी रोड भागातील श्री. कलाणी यांचे वाईन शाॅप नियमानुसार आहे. त्दुयामुळे त्यात दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे."

- संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक हाॅटेल असोसिएशन. 

----------------------------------------------------------

नाशिक   :  महामार्गावरील दारु दुकानांवरील निर्बंधांनतर अनेक दुकाने नव्या जागेत स्थलांतरीत झाली. नाशिक शहरातही त्याचे आंदोलन पेटले आहे. शहरात दोन वाईन शॉप्सना निवासी इमारतीत परवानगी मंजुरी मिळाल्याने महिलांचे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात स्थानिक  तीन  आमदार आंदोलकांच्या बाजूने तर राज्य उत्पादन खाते दुकानदाराच्या बाजूने अशी स्थिती आहे. 

नाशिक, त्र्यंबकेश्वर म्हणजे धार्मिक नगरी असल्याने दारु दुकानांविरोधात सातत्याने आंदोलने होतात. आता त्यात साधू- महंतांनीही उडी घेतली आहे .  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चार महिने दुकाने बंद आहेत. ही दुकाने  महामार्गापासून 500 मीटर लांब व शहरात स्थलांतरीत करण्यास जिल्हा प्रशासनाच्या धोरणानुसार परवानगी दिली आहे. यामध्ये दिंडोरी रोड व अशोका रोड या वर्दळीच्या रस्त्यावरील निवासी इमारतीत दोन दुकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने हलविली.

 त्याविरोधात महिलांचे मोठे आंदोलन उभे राहिले आहे. रात्रभर या महिला दुकानाबाहेर ठिय्या देऊन असतात. आता त्यात मुलेही उतरल्याने शहरातील भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे व सीमा हिरे या तिन्ही आमदारांनी आंदोलनाला पाठींबा देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट गेतली. पालकमंत्री गिरीष महाजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांना वाईन शॉपचे  स्थलांतर नागरी वसाहतीत करण्याच्या  विरोधात पत्र दिले. 

नव्या निकषांनुसार परवानगी दिल्याचा दावा करुन प्रशासन  निर्णयावर ठाम आहे. राज्य शासन आर्थिक अडचणीत असल्याने मद्यविक्री दुकानांच्या स्थलांतरासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रीही ठाम आहेत. दुसरीकडे दुकानांविरोधात महिलांचे आंदोलन दिवसेंदिवसे तीव्र होत आहे . त्याला आता अन्य संघटनांनीही पाठींबा दिला.

वातावरण तापलेले असल्याने कॉंग्रेसनेही संधी साधत दुकानाबाबत भाजपवर टीका सुरु केल्याने स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. सध्या हा वाद चांगलाच तापला असून दुकानदाराचाही राजकीय प्रभाव असल्याचे बोलले जाते. त्याने नमते घेण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासन बाजूने तर आमदार व नागरीक दुकानाच्या विरोधात असे भाजप विरुध्द भाजप वातावरण आहे. 
 

 

संबंधित लेख