सभागृह नेत्यांच्या करामतींनी नाशिक महापालिका हैराण

नाशिक महानगरपालिकेच्या कारभाराची घडी बसावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आदी सर्वच मंडळी महापौर, उपमहापौर, गटनेते सगळ्यांनाच जमेल तेवढे सहाय्य करीत आहेत. महापालिकेच्या सत्तेद्वारे राजकीय वातावरण अनुकुल व्हावे याची धडपड आहे. मात्र, सभागृहनेते दिनकर पाटील यांचे रोजचे काम पाहता त्यातून घडी विस्कटण्याचीच शक्‍यता दिसू लागली आहे.
सभागृह नेत्यांच्या करामतींनी नाशिक महापालिका हैराण

नाशिक - राजकारणात तडजोडी अपरिहार्यच असतात. मात्र, कधी कधी त्या किती महागात पडू शकतात याचा अनुभव भाजपचे सगळेच नेते सध्या महापालिकेच्या स्वपक्षाच्या सभागृह नेत्यांच्या करामतींद्वारे अनुभवत आहेत. त्यांच्या या करामती शहराची व्यवस्था, लोककल्याण आणि प्रशासनात अडथळे तर आणतातच, शिवाय सहकारी पक्षांचा विरोध देखिल ओढवून घ्यावा लागतो. या करामती महापौरांच्या दृष्टीनेहीडोकेदुखी ठरल्याने त्यांना आवर घालायचा कुणी? हा पेच आता निर्माण झाला आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या कारभाराची घडी बसावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आदी सर्वच मंडळी महापौर, उपमहापौर, गटनेते सगळ्यांनाच जमेल तेवढे सहाय्य करीत आहेत. महापालिकेच्या सत्तेद्वारे राजकीय वातावरण अनुकुल व्हावे याची धडपड आहे. मात्र, सभागृहनेते दिनकर पाटील यांचे रोजचे काम पाहता त्यातून घडी विस्कटण्याचीच शक्‍यता दिसू लागली आहे. शहर स्वच्छ असावे म्हणून आयुक्तांनी शहरात रात्रीची स्वच्छता सुरु केली. नागरिकांत त्याचे कौतुक झाले.

सभागृहनेत्यांनी ही सफाई बंद करण्याचे फर्मान काढले आहे. सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त हा महापौरांचा अधिकार. मात्र, हे इतिवृत्त त्यांना हवे आहे. ज्या सभेला विरोधक हजरच नव्हते त्या सभेत ते काय बोलले त्याचे इतिवृत्त त्यांनी महासभेत वाचले. त्यामुळे सुरळीत सुरु असलेल्या कामात विरोधकांनी अडथळा आणून नव्या राजकीय वादाला खतपाणी घातले. 130 कोटींच्या कामांचे प्रस्ताव त्यांनी मांडले. त्यात 125 कोटींची कामे स्वतःसाठी व पाच कोटी उर्वरीत 121 नगरसेवकांसाठी ठेवली.

कोणत्याही अधिकाऱ्याच्या कार्यालयात ते केव्हा धडकतील व काय फर्मान काढतील, याची शाश्‍वती नसल्याने ते कार्यालयात येण्याची चाहूल लागली की अनेक अधिकारी 'फिल्ड व्हीजिट'ला सटकतात. त्याची चर्चा आता शहरभर झाल्याने भाजपला 'असंगाशी संग..' म्हणजे काय याची प्रचिती येऊ लागली आहे.

दिनकर पाटील यांची राजकीय कारकिर्द जनता दलातून सुरु झाली. त्या पक्षात फारसे कोणीच राहिले नसल्याने त्यांचा एकछत्री अंमल होता. गेल्या पंचवार्षिकला ते काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांच्या अशाच लहरी कारभाराने गेले दहा वर्षे काँग्रेसचे स्थानिक नेते त्रस्त होते. सगळा पक्ष पूर्वेला तर हे पश्‍चिमेला अशी स्थिती असे. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गोविंदराव आदीकही असेच हैराण झाले होते. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याशी तर त्यांचे कधीच जमले नाही. जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब थोरात यांनाही पाटील यांच्या कामाच्या पध्दतीने असहाय्य व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावर पाणी साडोवा लागले होते.

शिवाजीनगर भागातून सलग तीन वेळा नगरसेवक असलेल्या पाटील यांनी 2014 मध्ये असाच अनाकलनीय निर्णय घेत बहुजन समाज पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली. काँग्रेसने त्यांना बडतर्फ करुन स्वतःची सुटका केली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपला या भागात अजिबातच जनाधार नसल्याने त्यांनी पाटलांना पावन करुन घेतले होते. त्याचे काय परिणाम होतात याचा अनुभव सध्या स्थानिक नेते घेत आहेत. त्यांचा हा कारभार अन्‌ भाजपची झालेली दशा पाहता, संत तुकोबांच्या गाथेतील ''अवगुणांचे हाती। आहे अवघी फजीती।।'' या अभंगाची प्रचिती येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com