Nashik Political News Shivsena Co-opted Members | Sarkarnama

सतरंज्या टाकणारे होणार शिवसेनेचे नगरसेवक!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सर्वसामान्य शिवसैनिकांना संधी देण्याचे शिवसेनेची परंपरा आहे ती कायम ठेवली आहे

- अजय बोरस्ते, महानगर प्रमुख.

नाशिक : राजकारणात पैशाशिवाय निभाव लागत नाही असा प्रघात पडला आहे. नाशिक शहरात शिवसेनेना मात्र हा समज खोटा ठरवला आहे. सलग बत्तीस वर्षे घरचा जेवणाचा डबा घेऊन सायकलवर कार्यालयात येणाऱ्या, पक्षाच्या कार्यक्रमात सतरंज्या टाकणारा अन् पक्षाचे पडेल ते काम करणा-या सुनिल गोडसे आणि राजू वाकसरे यांना पक्षाने महापालिकेचे स्विकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या विनंतीवरून शिवसेनेने आज स्विकृत सदस्यांची नावे घोषित केली. यामध्ये 32 वर्षांपासून शिवसेना कार्यालयात काम करणारे सचिव सुनिल गोडसे, राजु वाकसरे यांसह अलका गायकवाड व महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अॅड. शामला दीक्षित यांचा समावेष आहे. हे चारही सदस्य पक्षाचे एकनिष्ठ व अतिशय सामान्य कौटुंबिक पार्शभूमी असलेले आहेत.

पालिका सभागृहात नगरसेवकांची संख्या 122 आहे. पक्षीय बलाबलानुसार पाच सदस्यांना स्विकृत म्हणून नियुक्त करता येते. भाजपचे 66 नगरसेवक लक्षात घेता पाच पैकी तीन तर शिवसेनेच्या 35 नगरसेवकांची संख्या लक्षात घेता दोन स्विकृत नगरसेवक नियुक्त करता येणार आहेत. दोन जागांसाठी शिवसेनेत मोठी चुरस निर्माण झाली होती. पक्षांतर्गत चढाओढ लक्षात घेता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यापेक्षा 'मातोश्री'वरूनच नावांची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चाळीस इच्छुकांची नावे पाठविण्यात आली होती त्यात बारा नावे महत्वाची मानली जात होती. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई व संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी चार नावे सुचविली आहे. त्यात सर्वसामान्य शिवसैनिकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

यापुर्वी शिवसेनेने दादाजी आहेर, राजकुमार सुर्यवंशी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली होती. आता गेल्या 32 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेल्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर व गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले.

 

संबंधित लेख