Nashik News - Udayanraje Bhosale | Sarkarnama

उदयनराजे करणार नाशिकमधील नांदूरवैद्य `स्मार्ट व्हिलेज'

संपत देवगिरे 
रविवार, 23 जुलै 2017

समन्वय व नियोजनाअभावी नांदूरवैद्य गावात बहुसंख्या अडचणी आहेत. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन आराखडा केला असून त्याचे काम सुरु केले आहे. 
- सौ. सुनिता येवले, पुणे. 
 

नाशिक : बहुला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील एक किल्ला. या किल्ल्याच्या पंचक्रोशीतील गावे ब्रिटीशांनी तोफांच्या सरावासाठी ताब्यात घेतली अन्‌ गावकरी विस्थापीत झाले. यातील विस्थापीत नांदूरवैद्य गाव पाऊणशे वर्षांनी स्मार्ट व्हीलेज होऊ घातले आहे. त्यासाठी पुढाकार घेतला आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनुयायांनी सामाजिक उपक्रमांसाठी स्थापन केलेल्या "खासदार उदयनराजे भोसले प्रेरित स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान' या संस्थेने या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केला आहे. ग्रामपंचायतीने त्यासाठी ठराव केल्यावर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. अध्यक्षा सौ. सुनीता येवले, दिलीप मुसळे, अजय येवले, पराग मालवदकर, मोसीन शेख (पिंपरी चिंचवड), अमोल ढमाले- देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीतात्या मुसळे, सरपंच दिलीप मुसळे यांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांचा मेळावा होऊन चर्चा झाली. पीक नियोजन, आर्थिक उन्नतीसाठी दूध संकलन व प्रक्रीया, पायाभूत सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, शौचालये, आरोग्य अशा सर्व विषयांसाठी त्यांनी कामे निश्‍चित केली आहेत. जवळच असलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या सल्ल्यानुसार गावाच्या शिवारातील पीकनियोजन केले जाणार आहे. त्यामुळे तीनशे उंबऱ्यांच्या गावाचा कायापालट होईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

नांदूरवैद्य हे गाव तसे दुर्लक्षीत मात्र त्याचा इतिहास रंजक आहे. शिवाजी महाराजांचे सरदार राऊतकुमार ढमाले (देशमुख) यांचा या गावात पुरातन वाडा आहे. ब्रिटीशांनी तोफखान्याच्या विस्तारासाठी बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा येथील तोफखाना 1941 मध्ये देवळाली (नाशिक) येथे स्थलांतरीत केला. तोफांच्या सरावासाठी येथील पस्तीस गावांची जमीन ताब्यात घेतली. त्यामुळे विस्थापीत झालेल्या या गावातील नागरीक मुंबईला हमालीसह विविध रोजगारासाठी स्थलांतरीत झाले. राहिलेले नागरीक तोफांच्या सरावादरम्यान तोफगोळ्यांच्या स्फोटाने बाहेर पडणारे तांबे व पितळ गोळा करण्याचे धोकादायक व अनधिकृत काम करू लागले. त्यात कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्येक घरात एक तरी अपंग किंवा विधवा येथे होती. त्यात गुरफटलेल्या गावकऱ्यांना जगण्याची नवी दिशा काही सापडत नव्हती. खासदार उदयनराजेंच्या पुढाकाराने सुरू होणारा स्मार्ट व्हीलेजच्या प्रकल्पाने पाऊणशे वर्षांनी नांदूरवैद्यला एक आशेचा किरण दिसला आहे. 

उदयनराजे अन्‌ नाशिक 
खासदार उदयनराजे भोसले यांचे नाशिकशी निकटचे नाते आहे. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या सुरगाणा संस्थानचे राजे धैर्यशीलराव पवार यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण नाशिकला तर शिक्षण देवळालीच्या ब्रिटीश शिस्तीतील बार्न्स स्कूल या शाळेत झाले आहे. त्यामुळे त्यांची नाशिक व नाशिककरांशी विशेष जवळीक आहे. त्यामुळेही या प्रकल्पाची चर्चा आहे. 

संबंधित लेख