सदाभाऊ संप मोडला, आता कर्जमाफीवर गप्प का?
'सदाभाऊ शेतकरी संप मोडायला तर खुप धावपळ केली. मुख्यमंत्र्यांच्या खुष केले. आता कर्जमाफीवर तोंड का शिवले? तुम्ही शेतक-यांचे प्रतिनिधी का सरकारचे?. बाकीच सोडा, कर्जमाफी कधी मिळेल तेव्हढेच बोला...'अशा एक ना अनेक प्रश्नांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतक-यांनी हैराण करुन सोडले.
नाशिक : 'सदाभाऊ शेतकरी संप मोडायला तर खुप धावपळ केली. मुख्यमंत्र्यांच्या खुष केले. आता कर्जमाफीवर तोंड का शिवले? तुम्ही शेतक-यांचे प्रतिनिधी का सरकारचे?. बाकीच सोडा, कर्जमाफी कधी मिळेल तेव्हढेच बोला...'अशा एक ना अनेक प्रश्नांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतक-यांनी हैराण करुन सोडले.
शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईला जातांना सदाभाऊ खोत रस्त्यावरील पांगरी (ता. सिन्नर) येथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असल्याने काही वेळ थांबले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, पंचायत समिती सदस्य व शेतकरी संघटनेचे रविंद्र पगार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम पगार यांनी त्यांचे स्वागत केले. गप्पा सुरु होणार तेव्हढ्यात 'एका शेतक-याने साहेब तुम्ही शेतकरी संप मोडण्यासाठी खुप धावपळ केली. तुम्ही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मंत्रीमंडळात गेला होता. याचा तुम्हाला विसर पडला की काय?'
असे थेट विचारले.
त्यावर सदाभाऊ त्यांना समजावत असतानाच दुसरा शेतकरी त्यांना थांबवत म्हणाला, ''अहो कर्जमाफीचा एक पैसाही मिळाला नाही. तुमचे सरकार कर्जमाफी केव्हा देणार हे बोला. तुमच्या निकषांमुळे आमच्या गावात दहा- पंधरा जणांचीच कर्जमाफी होईल. गावात आजच प्यायला पाणी नाही. शेती पिकत नाही. आम्ही करायच काय़?''
अनेक शेतकरी असे प्रश्न विचारु लागल्यावर गोंधळ झाला. ज्येष्ठांनी हस्तक्षेप करीत लोकांना शांत केले. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी ''सरकार कर्जमाफी करणारच आहे. तुम्ही धीर धरा. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन चर्चा करीन. त्यानंतरही कर्जमाफी झाली नाही तर आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. त्यासाठी तुम्ही माझ्या पक्षाचे सदस्य व्हा.'' असे आवाहन केले. त्यावर कोणीच काही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. मात्र लोक पुन्हा कर्जमाफीविषयी विचारणा करु लागले.
एकाच वेळी अनेक लोक प्रश्न विचारीत राहिले. त्यात काहीच ऐकू येत नव्हते. त्यामुळे मग राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही भोजापुर धरणाचे किंवा पुराचे पाणी गावाला कसे मिळेल, कोणती योजना लागू करता येईल यावर विचार करु असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पुढील प्रवासाला निघुन गेले. मात्र, शेतकरी त्यानंतरही बराच वेळ त्याबाबत चर्चा करीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओसरीत थांबून होते. सदाभाऊंचा ही धावती भेट राजकीय चर्चेचा विषय मात्र ठरली होती.