आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घरकुल घोटाळ्याला हात घालताच भाजप- सेनेचे हाताची घडी अन् तोंडावर बोट !

नगरसेवकांना प्रलंबित कामे मार्गी लावायचे असेल तर 257 कोटी रुपयांच्या विकास कामे रद्द करावे लागतील असे सांगताचं स्थायी समिती सदस्यांची बोलती पुन्हा बंद झाली. त्यामुळे आयुक्तांनी तोंड उघडले तर काय होते याची जाणीव नगरसेवकांना झाली असावी .
आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घरकुल घोटाळ्याला हात घालताच भाजप- सेनेचे हाताची घडी अन् तोंडावर बोट !

नाशिक :  महापालिका स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली ती आयुक्तांच्या कणखर भूमिकेने. स्थायी  समितीची मुदत आठवड्याभरात पूर्ण होत आहे. अशा स्थितीत जाता जाता काही अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणुन भाजप- शिवसेनेच्या सदस्यांनी पेस्ट कंट्रोल चौकशीचा विषय काढला.

 त्यावर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घरकुल घोटाळ्याच्या चौकशीला तारीख पे तारीख कशी काय देता हो ?असा प्रश्न करताच भाजप- सेनेच्या नगरसेवकांनी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवले. विरोधकांनीही त्यावर या दोन्ही पक्षाची चांगलीच खिल्ली उडवली.

सध्याच्या स्थायी समितीच्या स्थापने नंतर शहरातील पेस्ट कंट्रोल कंत्राटाच्या तक्रारींबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. प्रशासनामार्फत त्याची चौकशी अद्याप अपूर्ण आहे. यामध्ये स्थायी  समितीच्या सभेत आज पेस्ट कन्ट्रोल साठी 67 लाख रुपयांच्या औषध खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

भाजपचे जगदीश पाटील यांनी पेस्ट कंट्रोल कंत्राटाच्या चौकशीविषयी विचारणा केली. चौकशीचा अहवाल अद्याप सादर न झाल्याने आरोग्य अधिकाऱ्यांवर आरोप देखील केले. त्यानंतर मुशीर सय्यद, सूर्यकांत लवटे यांनी पाटील यांच्या सुरात सुर मिळविल्याने या मुद्यावर एरव्ही एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करणारे स्थायी समितीतील भाजप शिवसेनेचे सदस्य एक झाल्याचे दिसून आले. 

त्यावर पुढील सभेत चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. मात्र सदस्यांनी त्यांच्या निलंबनाचीच मागणी केली. त्यामुळे वातावरण तापले. त्यात आयुक्त कृष्णा यांनी हस्तक्षेप केला. 

घरकुल घोटाळ्याविषयी उपायुक्त रोहिदास बहिरम यांची स्थायी समिती मार्फत चौकशी सुरु आहे. बहिरम यांच्या चौकशीच्या प्रक्रियेत स्थायी समितीचे सदस्य जसा विलंब करीत आहेत. तसाच अनुभव पेस्ट कन्ट्रोलच्या बाबतीतही येत असल्याचा टोला लगावून त्यांनी सदस्यांना गप्प केले. 

चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून वाचनानंतरचं पुढील सभेत सादर करण्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. मात्र यामध्ये घरकुल घोटाळ्यातील अधिका-यांविषयी सदस्याची सहानुभुती लपुन राहिलेली नसल्याने त्यांनी लगेचच एक सुरात पुढचा विषय चर्चेला घेतला. थोडक्यात सगळ्यांनी गप्प राहण्यातच हित मानल्याने विरोधकांत मात्र त्याची चर्चा चांगलीच रंगली. 

तर रस्ते विकास कामांना ब्रेक
स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांकडून प्रलंबित कामांची मागणी होवू लागल्याने आयुक्त कृष्णा यांनी त्या विषयावर देखील नगरसेवकांना ब्रेक लावला. नगरसेवकांना प्रलंबित कामे मार्गी लावायचे असेल तर 257 कोटी रुपयांच्या विकास कामे रद्द करावे लागतील असे सांगताचं स्थायी समिती सदस्यांची  बोलती पुन्हा बंद झाली. त्यामुळे आयुक्तांनी तोंड उघडले तर काय होते याची जाणीव नगरसेवकांना झाली असावी . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com