आरोग्यमंत्री आहेरांचे आजारपण हा आयुष्यातील टर्निंग पॉंईट : आमदार डॉ. राहुल आहेर 

मी ऑर्थोपेडीक्‍स सर्जन. त्यात मी रमलो होतो. वडील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांची 2008 मध्ये प्रकृती खालावली. त्यांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात महिनाभर मी त्यांच्यासमवेत राहिलो. भेटायला येणारी माणसं, त्यांचे प्रश्‍न पाहिले. समाजाविषयी वडिलांची तळमळ पाहिली अन्‌ राजकारणात पडलो. हा आयुष्याचा टर्निंग पॉंईंट ठरला..... चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर 'सरकारनामा'शी बोलत होते.
Rahul Aher
Rahul Aher

नाशिक : मी ऑर्थोपेडीक्‍स सर्जन. त्यात मी रमलो होतो. वडील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांची 2008 मध्ये प्रकृती खालावली. त्यांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात महिनाभर मी त्यांच्यासमवेत राहिलो. भेटायला येणारी माणसं, त्यांचे प्रश्‍न पाहिले. समाजाविषयी वडिलांची तळमळ पाहिली अन्‌ राजकारणात पडलो. हा आयुष्याचा टर्निंग पॉंईंट ठरला..... चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर 'सरकारनामा'शी बोलत होते. 

माजी आरोग्यमंत्री (कै) डॉ. दौलतराव आहेर राज्याच्या राजकारणातील नावाजलेले व्यक्तिमत्व. नाक, कान, घसा तज्ञ डॉ. आहेर 1980 च्या दशकात नाशिकला महापालिकेच्या यशवंत मंडईत आपले क्‍लिनीक चालवतानाच राजकारणाचे धडे गिरवत होते. शेतकरी कर्जमाफी, वसंतदादा साखर कारखाना, मराठा विद्या प्रसारक संस्था, शहराच्या प्रश्‍नांवर ते सक्रीय होते. 1985 मध्ये शरद पवार यांच्या पुलोद आघाडीत ते नाशिक मतदारसंघात भाजपचे आमदार झाले. 1989 मध्ये खासदार. 1995 मध्ये पुन्हा आमदार व आरोग्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. नेत्याचे घर म्हणुन दिवसभर वर्दळ, बैठकांचा रतीबच. मात्र त्यांचे सबंध कुटुंब त्यापासुन सदैव अलिप्तच असे

डाॅ. राहुल आहेर आपल्या प्रवासाविषयी सांगतात....
... आम्ही भावंड, आई आणि बाबा कधी एकत्र जेवल्याचे देखील मला आठवत नाही. वडिल आमदार झाले तेव्हा मी सेंट झेवीयर्स शाळेत सातवीत होतो. त्यानंतर अकरावी, बारावीचे शिक्षण के.टी.एच.एम. महाविद्यालयात, प्रवरा संस्थेत एम.बी.बी.एस. तर पुण्यात एम.एस. (ऑर्थो) केले. मुंबईत जे.जे, नाशिकला सिव्हील तसेच सह्याद्री, लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये नोकरी केली. 3 डिसेंबर, 2005 मध्ये मुंबई नाका येथे स्वतःचे शताब्दी हॉस्पीटल सुरु केले. रुग्ण, उपचार, शस्त्रक्रिया यातच रमलो होतो. वैद्यकीय व्यवसाय उत्तम सुरु होता. आयुष्य आनंदी होते. तेव्हा मी राजकारणात जाईन असे कोणी म्हटले असते, तर मीच काय सगळ्यांनीच त्याला वेडा ठरवले असते. 

.....याच सुमारास 2008 मध्ये वडिलांना मुत्रपिंडाचा त्रास सुरु झाला. तो विकोपाला गेला. याच दरम्यान त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मी रुग्णालयातच असे. मात्र, काम बंद करुन मी त्यांच्या जवळ थांबत असे. नंतर तर अगदी रात्रीही तिथेच थांबु लागलो. शेकडो लोक त्यांना भेटायला येत. ते माझ्याशीही बोलत. तेव्हा वडिलांचे काम, जनसंपर्क अन्‌ समाजासाठी त्यांची तळमळ पाहून असे सुध्दा एक विश्‍व, धडपड, काम असते याचा मनावर खोलवर परिणाम झाला. वडिलांविषयीचा अभिमान तेव्हा वाढला. त्यातुन मी राजकारणाची वाट धरली. 

2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी केली. यश नाही मात्र अनुभव मिळाला. 2012 मध्ये महापालिकेत प्रभाग 15 मध्ये नगरसेवक झालो. 2014 मध्ये तयारीनीशी विधानसभेची उमेदवारी केली अन्‌ आमदार झालो. आता तेच सर्व करतो आहे, जे वडील करीत होते. मतदारसंघातील दोन्ही तालुके दशका नु दशके दुष्काळी आहेत. रस्ते आणि पाणी हे दोन प्रश्‍न घेऊन मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास घेतला आहे. वडिलांचे आजारपण हा माझ्या आयुष्यातील राजकीयदृष्ट्या टर्निंग पॉंईंट ठरला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com