Nashik Markey Committee Fraud | Sarkarnama

नाशिकला कोट्यावधींचा गाळे घोटाळा : सचिव रजेवर

संपत देवगिरे
गुरुवार, 15 जून 2017

नाशिक -सहकारात राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर होत आहे. मात्र, त्याचा लाभ घेऊन भाजपमध्ये दाखल झालेली मंडळीच गैरव्यवहार करीत असल्याचे मोठे प्रकरण नाशिकच्या बाजार समितीत उघड झाले आहे.

नाशिक -सहकारात राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर होत आहे. मात्र, त्याचा लाभ घेऊन भाजपमध्ये दाखल झालेली मंडळीच गैरव्यवहार करीत असल्याचे मोठे प्रकरण नाशिकच्या बाजार समितीत उघड झाले आहे.

नाशिक बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देविदास पिंगळे यांच्यावर कर्मचारी वेतनवाढीच्या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जामीन मंजूर करतांना बाजार समितीच्या कामकाजात भाग घेऊ नये अशी अट घातली. त्यामुळे तत्पुरती व्यवस्था म्हणून नेमलेल्लीया संचालकांची समिती व प्रशासनाकडून त्याचा राजकारणासाठी वापर सुरु झाल्याचे चित्र आहे.

पिंगळे यांनी राजीनामा द्यावा या दबावाला पिंगळे यांनी झुगारल्यावर विश्वास नागरे, तुकाराम पेखळे यांसह चार संचालकांचा भाजप प्रवेश झाला. सत्तेची सावली मिळताच या संचालकांनीच पडद्यामागून समितीचा व्यावहार ताब्यात घेतला. यामध्ये गेल्या महिन्यात कोट्यावधींचे आठ गाळे परस्पर विकले गेले, त्याची माहिती विचारली होती.

यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ज्या संचालकांनी माहिती विचारली त्यांच्याच नावाचे ठराव असलेले इतिवृत्त समोर आहे. वस्तुतः संजय तुंगार, विमल जुंद्रे, युवराज कोठुळे, रवींद्र भोळे हे संचालक गैरहजर असतांना त्यांच्या नावाचे ठराव कसे आले यावरुन प्रचंड वादविवाद झाले. या चर्चेत एकामागोमाग अनेक प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याने नियमबाह्य काम करणा-यां सचिवांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी सचिवांची बाजू घेणारे शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे यांनाही संचालकांनी समज दिली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची आजच्या मासिक बैठकीत विविध आरोप प्रत्यारोपांनी चांगलीच खडाजंगी झाली. व्यापाऱ्यांना लोखंडी शेडऐवजी बांबूचे शेड बांधण्यास परवानगी तसेच निलंबित कर्मचाऱ्यांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने 'जैसे थे' ठेवण्याबाबत बैठकीत एकमत झाले. बैठकीत अठरापैकी दहा विषयांना मंजुरी तर वादग्रस्त आठ विषय नामंजूर करण्यात आले. बैठकीत समाधानकारक कामकाज नसल्याचा ठपका ठेवत विद्यमान सचिवांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक विविध विषयांवर आज सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात बोलाविण्यात आली होती. बैठकीस बहुसंख्य संचालक उपस्थित होते. समितीचे प्रभारी सभापती श्‍यामराव गावित अध्यक्षस्थानी होते. बैठकीच्या सुरवातीला शिवाजी चुंभळे यांनी समिती कोणाच्या वैयक्तिक मालकीची नसल्याचे सांगत चुकीची कामे न करण्याचा सल्ला दिला. संचालक शंकरराव धनवटे, दिलीप थेटे, संजय तुंगार आदी काही सदस्यांनी आक्रमक होत सचिव मिटिंगची माहिती न देता सदस्यांसह सभापतींची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

यानिमित्ताने सहकारातील भाजप विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस या वादाचा लाभ भाजपमध्ये दाखल झालेली अन्य पक्षाची मंडळीच मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ती भाजपचे नेते व पालकमंत्र्यांना नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.  

 

संबंधित लेख