लोकसभेचा निर्णयात नाशिकमध्ये छगन भुजबळ अन् निलीमाताई पवारांनाच महत्व
लोकसभा निवडणूक वेळापत्रकाची अनश्चितता संपली आहे. सामान्यतः डिसेंबर- जानेवारीत निवडणुका जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुकांची धावपळ जोरात आहे. सत्ताधारी व सरकारकडूनच विरोधकांना राजकीय मुद्दे उपलब्ध झाले. इच्छुकांची सर्व तयारी त्यावर आधारीत आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे.
लोकसभा निवडणूक पुढील वर्षाच्या प्रारंभी होईल. भाजपच्या खासदारांना पक्षाने तसे संकेत दिले. त्यामुळे जिल्ह्याशी संबंधीत नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघातील खासदार गतीने जनसंपर्क व राजकीय गोळाबेरीज करण्यात व्यग्र आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या दहा दिवसात गणपतीच्या आरती, बैठका आणि दौरे यातुन शंभराहून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शनिवारपासून अधिकृतपणे निवडणूक दौरा सुरू केला आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा दिल्ली ऐवजी मालेगाव, सटाणा येथे संपर्कावर भर आहे. सोशल मिडीया आणि अन्य बातम्यांतुन हे राजकारण तापल्याचे दिसते. ही सर्व तयारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार या गृहीतकावर आधारीत आहे. त्यामुळे 2014 मध्ये मोदी लाटेवर स्वार झालेल्या या तिन्ही विद्यमान खासदारांना यंदा आपले प्रगती पुस्तक घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. हीच त्यांची मोठी राजकीय परिक्षा असेल.
भाजपने 2014 आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका 'केडर'बेस केल्या. गेल्या चार वर्षात यातुन विरोधकांनाही निवडणुकांना सामोरे जातांना होमवर्क करण्याची सवय जडली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिकमध्ये गेले सहा महिने त्यावर भर दिला होता.आता सर्वाधिक वेगाने या पक्षाच्या मुंबईतील 'वॉररूम' मध्ये काम सुरू आहे. त्याला संघटनेतील कार्यकर्त्यांची जोड आहे. यातील एकही बुथप्रमुख किंवा यंत्रणेतील व्यक्ती बनावट असणार नाही. यासाठी आधार, ओळखपत्रे व अन्य साधनांची बारीक तपासणी केली जात आहे.
नाशिक, दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेस पक्षाशी युती झाली तरी त्यांची संघटनात्मक स्थिती लक्षात घेता त्याचा उपयोग किती हे अनिश्चित आहे. दिंडोरीत भारती पवार या सांभाव्य उमेदवार आहेत. त्यांचा जनसंपर्क व प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न गांभीर्याने सुरू आहेत. खरी समस्या नाशिक मतदारसंघात आहे. येथे विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह पदाधिकाऱ्यांनीच अपशकुन केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मराठा विद्या प्रसार समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी संमती दिल्यास त्यांचा विचार प्राधान्याने होऊ शकतो. यापूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यात त्यावर चाचपणी झाली. मात्र, उमेदवारीच्या निर्णयप्रक्रीयेवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा प्रभाव असेल. सिन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार राजाभाऊ वाजे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोन गटात राजकारण केंद्रीत आहे.
राष्ट्रवादीला आज तिथे नगण्य स्थान आहे. तरीही पक्षाने नुकतीच लोकसभेचे अध्यक्ष म्हणुन वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कोंडाजी मामा आव्हाड यांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीसाठी पक्षातुन झालेला विरोध बोलका होता. त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर सर्वच इच्छुक अद्यापही सावध प्रतिक्रीया देतात. ही इच्छुकांची अडचण असल्याने त्यांची भूमिका सावध आहे. उमेदवारांना अडचणीची तशीच राजकीय प्रतिमा म्हणुन भुजबळांच्या समर्थकांनाही लाभदायक नाही. त्याचे काय निराकरण होते, यावर निवडणुकीचे गणित ठरेल. यंदाच्या निवडणुकीची हवा तापु लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केलेले आव्हान भाजप, शिवसेनेच्या प्रस्थापित खासदारांना सोपे मात्र नक्कीच नाही.