Nashik of Happy During Bhujbal's Tenure Claims Local NCP | Sarkarnama

भुजबळांच्या काळात नाशिक असे उघड्यावर नव्हते! : स्थानिक राष्ट्रवादीचा दावा

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

येवला तालुका दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

येवला : "पालकमंत्री दमदार असेल तर जिल्ह्याच्या वाट्याला हाल येत नाहीत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री असताना जिल्ह्यासह येवल्याला पाणी व दुष्काळासाठी रस्त्यावर येण्याची वेळ येत नव्हती. त्यांच्या कार्यकाळात नाशिक असे पोरके आणि उघड्यावर नव्हते," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी येथे केला.

येवला तालुका दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 'तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे, मात्र शासनाने दुष्काळी तालुक्‍यांच्या यादीत त्याचा समावेश केलेला नाही, पालकमंत्र्यांचे याकडे लक्ष नाही. छगन भुजबळ असताना कोणत्याही तालुक्‍यावर असा अन्याय होत नव्हता. त्यांचे प्रत्येक समस्येवर बारीक लक्ष असायचे. मात्र आज नाशिकला पालकच नाही. जिल्हा पोरका आहे. नाशिक उघड्यावर आले आहे.' अशी टीका पदाधिकाऱ्यांनी केली. 

आमदार भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत नेत्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. या वेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर घोषणा देत ठिय्या आंदोलनही केले. या वेळी तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पगार, शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, अरुण थोरात असे विविध नेते गट-तट विसरुन एकत्र आले होते. 

2019 साल कुणाच? हवेतले अंदाज नव्हेत - वस्तुस्थितीवर आधारित शास्त्रशुद्ध सर्वेक्षण - सरकारनामा दिवाळी अंकात - आजच मागणी नोंदवा 

संबंधित लेख