nashik farmers strike | Sarkarnama

नाशिकमध्ये संपाचा जोर कायम, सायंकाळी बैठक

संपत देवगिरे
रविवार, 4 जून 2017

निफाड तालुक्‍यात संपाची तीव्रता अधिक असून विंचूर येथे औरंगाबाद महामार्गावर दूध ओतून रास्ता रोको करण्यात आला. विविध भागात हे लोण पसरले असून आज सायंकाळी चारला नाशिक बाजार समितीत आंदोलनाबाबत संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे.

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी संपाचा जोर कायम असून जिल्ह्यातील सर्व सतरा बाजार समित्या बंद आहेत. बहुतांश दूध संकलन केंद्र बंद असून काल रात्री दळवट (ता. कळवण) येथे शेतकऱ्यांनी गुजरातला जाणारे ट्रक अडवल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आज सकाळी शहरात शिंदे, म्हसरुळ येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. उद्या (ता.5) राज्यव्यापी बंदची हाक दिली असल्याने त्याच्या तयारीसाठी आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यातील सर्व सतरा बाजार समित्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी बहुतांश ठिकाणी शेतमालाचे लिलाव होत नसल्याने आवक जवळपास नव्हती. त्यामुळे अनेक व्यापारी बांधावर खरेदीचे प्रयत्न करीत असले तरी खरेदी केलेला माल बाजारात नेणे अशक्‍य असल्याने तणावाची स्थिती आहे.

लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प असल्याने व्यापाऱ्यांकडे प्रशासन पाठपुरावा करीत आहे. काल रात्री दळवट (कळवण) मार्गे गुजरातला जाणारे भाजीपाल्याचे तीन ट्रक अडवले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर जमले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्याचा उपयोग न झाल्याने हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतर हे ट्रक सापुतारा मार्गे गुजरातला जाऊ शकले. 

आज सकाळी शहरात पुणे रस्त्यावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. आसखेडा येथे रास्ता रोको झाला. त्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलेही सहभागी झाले होते. न्यायडोंगरी (नांदगाव) येथे उद्याच्या बंदच्या तयारीसाठी फलक लावण्यात आले आहेत.

निफाड तालुक्‍यात संपाची तीव्रता अधिक असून विंचूर येथे औरंगाबाद महामार्गावर दूध ओतून रास्ता रोको करण्यात आला. विविध भागात हे लोण पसरले असून आज सायंकाळी चारला नाशिक बाजार समितीत आंदोलनाबाबत संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे.

या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, बुधाजीराव मुळीक यांसह विविध नेते सहभागी होतील अशी माहिती संयोजक चंद्रकांत बनकर यांनी दिली. 

संबंधित लेख