संघर्ष यात्रा "समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार

संघर्ष यात्रा "समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे आजपासून जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला. संघर्ष यात्रा 17 आणि 18 एप्रिलला नाशिक जिल्ह्यात असेल. मालेगाव, सटाणा, पिंपळगाव, घोटी येथे सभा होतील. तसेच समृद्धी महामार्गामुळे विस्थापित होत असलेल्या शिवडेतील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर संघर्ष यात्रा घोटीमार्गे शहापूरकडे रवाना होईल. 
कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, शेतकरी कामगार पक्षाचे ऍड. मनीष बस्ते, जनता दलाचे (सेक्‍युलर) बाळासाहेब जाधव, समाजवादी पक्षाचे इम्रान चौधरी, रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) शशिकांत उन्हवणे यांनी दिली. आमदार जयवंत जाधव, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, केरू पाटील हागवणे, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, पी. बी. गायधनी, गिरीश मोहिते आदी उपस्थित होते. 
संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार अबू आझमी यांच्यासह शंभर आमदार सहभागी होणार आहेत. 
सोमवारी मालेगावमध्ये आगमन 
धुळ्याहून सोमवारी (ता. 17) सकाळी दहाला मालेगावमध्ये संघर्ष यात्रेचे आगमन होईल. मालेगावमधील गिरणा नदीवरील पुलालगतच्या मैदानावर सभा होईल. त्यानंतर यात्रा पाच पैसे किलो भावाने कांदा विकला गेलेल्या नामपूर बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दुपारी दोनला सटाणा येथे सभा होईल. साडेतीनला देवळा येथील पाचकंदील चौकात, चारला वडाळीभोई येथे शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहे. सायंकाळी साडेचारला पिंपळगाव बसवंत येथील सभेनंतर सहाला आडगावमध्ये यात्रेचे स्वागत केले जाईल. 18 एप्रिलला पत्रकारांशी संवाद साधून पंचवटीत काळारामाचे दर्शन घेऊन यात्रा देवळाली कॅम्प, भगूर, पांढुर्लीमार्गे शिवडे येथे पोचेल. तिथे "समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले जाईल. त्यानंतर सायंकाळी सहाला घोटीमधील सभेनंतर यात्रा शहापूरकडे प्रस्थान करेल, अशी माहिती श्री. आहेर आणि ऍड. पगार यांनी दिली. 
शेतकऱ्यांचे फुलावेत संसार 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा संघर्ष यात्रेचा उद्देश नाही. उलट शेतकऱ्यांचे संसार फुलावेत, आत्महत्येचा विचार शेतकऱ्यांमध्ये डोकावू नये ही मूळ भूमिका त्यामागे आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारला माहीत नाहीत. त्यामुळे लोकशाही मार्गाने करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी 19 आमदारांना निलंबित करण्याची राजकीय खेळी सरकारने खेळली आहे, असेही विरोधकांनी सांगितले. 
बहुमताच्या जोरावर जनविरोधी धोरणे 
विरोधी पक्षामध्ये असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली आहेत. आता मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाही. उद्योगपतींचे एक लाख 82 हजार कोटींचे कर्ज माफ केले जात असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात अडचण येण्याचे कारण नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी काढून घेऊन उदरनिर्वाहाच्या साधनांपासून सरकार वंचित ठेवत आहे. बहुमताच्या जोरावर जनविरोधी धोरणे राबवली जात आहेत म्हणूनच विरोधकांनी एकजूट करून संघर्षाला सुरवात केली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे ऍड. मनीष बस्ते यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com