नाशिक दूध संघाचे 11 संचालक अपात्र

नाशिक दूध संघाचे 11 संचालक अपात्र

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी दूध संघाचे 15 पैकी अकरा संचालक संघाला दूधच पुरवत नसल्याचे उघड झाले आहे. नियमानुसार प्रत्येक संचालकाने दुधाचा पुरवठा करणे बंधनकारक असून तसे न केल्यास तो संचालक अपात्र ठरतो. त्यामुळे नाशिकच्या दूध संघाच्या या "भाकड' संचालकांना सहकार विभागाने अपात्र ठरवले. विभागीय उपनिबंधक बी. वाय पगारे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एस. मोरे व संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. बच्छाव या सदस्यांचे प्रशासकीय मंडळ आज नियुक्त केले. 

अपात्र संचालकांत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, छाया काळे, शिवाजी बोराडे, योगेश पगार भाऊसाहेब पाटील,होशीराम घोटेकर,सुभाष निकम,शरद लहरे, नथूजी सूर्यवंशी, विनोद चव्हाण, दिलीप शेवाळे यांचा समावेश आहे. नियमित दूध पुरवठा करणारे दिलीप कातकाडे, विजय कोतवाल, नामदेव ढिकले, कल्पना कुऱ्हे यांनीच दूध पुरवठा केला असल्याचे ते पात्र ठरले. इतरांनी वर्षभरात थेंबभरही दूध पुरवलेले नाही. दूध पुरवठ्यासह विविध कारणांमुळे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी आज हा आदेश काढला. 

जिल्हा दूध संघाच्या 367 दूध संस्था सभासद आहेत. त्यापैकी केवळ 17 संस्था संघास नियमित दूध पुरवठा करतात. 305 दूध संस्था केवळ नावालाच आहेत. त्यामुळे संघाचे दूध संकलन कमी होऊन दिवसाला केवळ बाराशे लिटर दूध संकलित होत आहे. 32 कायम कर्मचारी व त्यांच्यावर दरमहा पावणे तीन लाखाचा पगाराचा खर्च पाहता दूध संघ चालविण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरत असल्याचे निदर्शनास आले होते. केंद्र शासनाने दिलेल्या दोन कोटी साठ लाखाच्या पुनर्वसन निधीचा उपयोगही योग्य प्रकारे झाला नाही.त्यातील तीस लाख 56 हजार रुपये आजही न वापरता पडून आहेत.

पुनर्वसन निधीचा योग्य वापरही झाला नाही. त्यांतही अटी शर्तीचे उल्लंघन झाले. त्यानंतर निफाड येथील संघाचा गाळा 20लाखात विकण्याचे निश्‍चित झाले. मात्र पाच महिने होऊनही गाळ्यांची रक्कम संघाकडे जमा झाली नाही. या व्यवहारात निविदा धारकाची सव्वा लाखाची अनामत रक्कम जप्त करणे आवश्‍यक असतानाही त्याकडे संचालक मंडळ काना डोळा करत राहिले. 
कठोर कारवाई हवी 
दूध खरेदी, विक्री ऐवजी अन्य विषयांवरच संस्था जादा खर्च करीत होती. त्याने संस्था अवसायनात जाण्याचा धोका होता संघाच्या कारभाराची आर्थिक तपासणी करून कठोर कारवाई करावी.अशी मागणी नाशिक जिल्हा मजदूर संघाचे सरचिटणीस विजय मोगल यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com