Nashik Dhanjay Munde Writes to ACB | Sarkarnama

भाजपशी संबधित लाच प्रकरणात धनंजय मुंडेंची एंट्री

संपत देवगिरे
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना लाच स्विकारल्याने अटक झाली खरी. मात्र, हा तपास संथ करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून पडद्यामागून सूत्रे हलविली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात उडी घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना लाच स्विकारल्याने अटक झाली खरी. मात्र, हा तपास संथ करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून पडद्यामागून सूत्रे हलविली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात उडी घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शुक्रवारी (ता. 13) सरकारी ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, उपअभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना अटक केली. मात्र, त्त्यायानंतर लगेचच वरिष्ठ स्तरावरुन सूत्रे हलल्याने निवासस्थानांच्या तपासणीत विलंब झाल्याचा आरोप केला गेला. यावेळी काही भाजपचे नेते या अभियंत्यांच्या घरी तळ ठोकुन होते असा आरोपही केला जात आहे.

यातील अभियंता पवार हे भाजपच्या विद्यमान महापौर रंजना भानसी यांचे भाचे जावई आहेत. तर भाजप नेते माजी खासदार (कै) कचरुभाऊ राऊत यांच्या मुलाचे जावई आहेत. त्यांच्या नाशिकमधील नियुक्तीसाठी मंत्री व स्थानिक आमदारांनी शिफारस केली होती. त्यामुळे हे प्रकरण एकदम उजेडात आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सकाळी महापौरांना याचा जाब विचारण्यासाठी आक्रमक होत घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून कारवाई व सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तपास यंत्रणेला पत्रही दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय रंग आणखी गडद होऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतफे आज (ता. 16) भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात 'चलो पीडब्ल्यूडी'ची हाक देत आंदोलन करण्यात आले. संघटनेचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, साहेबराव मोरे, दीपक पगार, गोविंद पगार, सोमनाथ बोराडे, सुधाकर मोगल, संदीप जगताप, नितीन रोठे-पाटील, शरद लभडे, प्रफुल्ल वाघ, मनोज भारती, नितीन कोरडे, विक्रम गायधनी, किरण देशमुख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.  

'ते' चार तास अन्‌ अधिकाऱ्यांचे मौन
संशयितांना लाच स्वीकारताना अटक करताच दुसऱ्या पथकांनी संशयितांच्या घरावर छापे टाकणे, असाच 'लाचलुचपत'च्या कारवाईचा रिवाज आहे. मात्र, या तिघांच्या लाचखोरीत संशयितांना संधी तर दिली गेली नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सायंकाळी लाच घेताना झालेल्या कारवाईनंतर रात्री दहाच्या सुमारास संशयितांच्या घरावर छापे टाकले गेले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मौनाच्या जोडीला आता कारवाईनंतर छाप्यासाठी लागलेल्या चार तासांच्या कालावधीभोवती संशयाचे वारे घोंघावू लागले आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांची रोकड आणि दहा तोळे सोने हाती लागल्याचे तपासी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र कोट्यवधींच्या मायेची कागदपत्रे गेली कुठे, हा प्रश्‍न खुलेआम चर्चेत आलाय.

लाचखोर अभियंत्यांच्या कारवाईनंतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी जबाब घेण्यात येत आहेत.
- प्रभाकर घाडगे, तपास अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

संबंधित लेख