Nashik Corporator Chain Snatching | Sarkarnama

नाशिकच्या नगरसेविकेचेच मंगळसूत्र लंपास!

संपत देवगिरे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

महिलांच्या सोनसाखळ्या चोरीच्या तपासाविषयी भाजप आमदारांकडून पोलिसांच्या कामगिरीच्या कौतुकाच्या शब्दांची शाई वाळण्याआधीच भाजपच्याच वर्षा भालेराव या नगरसेविकेचे मंगळसूत्र खेचण्यात आले. या नगरसेविकेने स्वतःच सोनसाखळी चोऱ्यांविरोधात आवाज उठवत होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या सौ. भालेराव यांनी पोलिस, आमदार या सगळ्यांवर अविश्‍वास दाखवित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे.

नाशिक : महिलांच्या सोनसाखळ्या चोरीच्या तपासाविषयी भाजप आमदारांकडून पोलिसांच्या कामगिरीच्या कौतुकाच्या शब्दांची शाई वाळण्याआधीच भाजपच्याच वर्षा भालेराव या नगरसेविकेचे मंगळसूत्र खेचण्यात आले. या नगरसेविकेने स्वतःच सोनसाखळी चोऱ्यांविरोधात आवाज उठवत होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या सौ. भालेराव यांनी पोलिस, आमदार या सगळ्यांवर अविश्‍वास दाखवित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव या गंगापूर पलिस ठाण्याच्या गल्लीतच राहतात. गेले दोन महिने या भागात चोऱ्यांचे सत्र सुरु आहे ते थांबायला तयार नाही. अगदी पोलिस ठाण्याजवळची कार देखील चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केली होती. दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा ते सात महिलांच्या सोनसाखळ्या चौरट्यांनी खेचल्या. त्याबाबत या नगरसेविकेकडे तक्रारी आल्या. होत्या त्याबाबत त्यांनी आवाज उठवत पोलिसांनी कडक कारवाई व उपाययोजना करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असतांनाच रविवारी त्यांचेही मंगळसूत्र खेचण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दुपारी साडे चारला ही घटना घडली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले. संबंधीत चोरट्याला या भागाची माहिती असावी असे दिसते. मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही.

या घटनेमुळे भाजपच्या नगरसेविकेच्या आंदोलनाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. पोलिस कारवाई करीत नाही व त्यांचा चोरट्यांवर धाक नाही असा आरोप करीत त्यांनी पोलिसांत तक्रार न देता थेट मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन पाठविले आहे. 'शहरातल्या यंत्रणांचा धाक उरला नाही. त्यामुळे आता शहराला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच वाचवु शकतात. त्यांनी पोलिसांना सूचना द्याव्यात' अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये पोलिस व पोलिसांच्या कामगिरीचे सोशल मिडीयावर कौतुक करणाऱ्या भाजपच्या आमदारांचीही कुचंबणा झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

"महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरीचे प्रमाण खुपच वाढले आहे. त्यात पोलिस कारवाई करीत नाहीत ही सगळ्यांचीच तक्रार आहे. त्यामुळे याबाबत थेट मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.' - वर्षा भालेराव, नगरसेविका, भाजपा.

संबंधित लेख