Nashik Corporation's Notice to MLA Balasaheb Sanap | Sarkarnama

अविश्‍वास ठरावाचा घाट घालणाऱ्या आमदार सानपांना तुकाराम मुंढेचा 9 लाख भरपाईच्या नोटीशीचा दणका 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठरावासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचा पुढाकार होता. आज त्यांना नऊ लाख रुपये भरपाईची नोटीस बजावण्यात आली.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठरावासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचा पुढाकार होता. आज त्यांना नऊ लाख रुपये भरपाईची नोटीस बजावण्यात आली. महापालिकेच्या इमारतीचा विनापरवाना वापर व निमयमबाह्य वापर करुन ती आपल्या ताब्यात ठेवण्यास त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. 

महापालिका प्रशासनाने आज ही नोटीस काढली आहे. श्रीकृष्ण नगर येथील नासर्डी नदीलगत आमदार निधीतुन बांधलेल्या तीन मजली इमारतीविषयी या पूर्वी आक्षेप घेणारी तक्रार दाखल झाली होती. याठिकाणी आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी संबंधित संस्थेचा 2001 पासुन ताबा आहे.

त्याठिकाणी व्यायामशाळा, संपर्क कार्यालय तसेच ग्रंथालय सुरु करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी महापालिकेशी कोणताही अधिकृत करार करण्यात आलेला नव्हता. या इमारतीवर करआकारणीही करण्यात आलेली नव्हती. आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाविषयी पडद्यामागुन सर्व सुत्रे आमदार सानप यांनीच हलविली होती. त्यांनाच आज नोटीस बजावण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

यासंदर्भात आमदार सानप यांच्याशी संपर्क साधला असता, "आपल्याला नोटीस मिळालेली नाही. त्याविषयी काहीही माहिती नाही. मात्र अन्य सुत्रांकडून मला तशी माहिती मिळाली आहे. संबंधीत इमारत अधिकृत असुन आमदारांच्या निधीतुन तिची उभारणी झाली आहे. तिचा सार्वजनिक वापर केला जातो,"असे सांगितले. 

संबंधित लेख