Nashik Corporation Word of Exchange Between BJP Leaders | Sarkarnama

भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटलांनी सभापती हिमगौरी आडकेंना खडसावले 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

सभापतींनी रोखल्याचा राग आल्याने नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभापती हिमगौरी आडके यांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे स्थायी समितीची सभा कशी होते, ते पाहतोच, असे म्हणत सर्वांच्या चौकशा लावतो, असेही ओरडून सांगत सभागृह सोडले. या प्रकारामुळे नाशिक महापालिकेत भाजपअंतर्गत सुरु असेलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. 

नाशिक : महापालिका स्थायी समितीची बैठक चांगलीच वादळी ठरली. भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांना सभापती हिमगौरी आडके- आहेर यांना बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतापलेल्या पाटील यांनी 'सदस्य बोलत असताना आपण रोखताच कसे? काल निवडून आल्या अन्‌ आम्हाला शिकवता काय?,' असे सांगत आडकेंना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे सबंध सभागृह आवाक झाले. संतप्त पाटील यांच्या आक्रमकतेने सभापती आडके- आहेर अक्षरशः गांगरल्या. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र शांत राहणेच पसंत केले. 

यावेळी सभापतींनी रोखल्याचा राग आल्याने नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभापती हिमगौरी आडके यांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे स्थायी समितीची सभा कशी होते, ते पाहतोच, असे म्हणत सर्वांच्या चौकशा लावतो, असेही ओरडून सांगत सभागृह सोडले. या प्रकारामुळे नाशिक महापालिकेत भाजपअंतर्गत सुरु असेलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. 

सभा सुरू असताना भाभानगर येथील 100 खाटांच्या महिला रुग्णालयाचा विषय चर्चेला आला. या वेळी भगवान आरोटे, प्रवीण तिदमे, मुशीर सय्यद, संगीता आव्हाड यांनी मते मांडल्यानंतर दिनकर पाटील यांनी बोलण्यास सुरवात केली. गंगापूर येथील रुग्णालय का बंद केले? असा सवाल प्रशासनाला केला असता सभापती हिमगौरी आडके यांनी त्यांना बोलण्यास रोखून प्रभागातील मुद्द्यांऐवजी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यास सांगितले. 

त्याचा राग आल्याने दिनकर पाटील यांनी थेट सभापतींना, "मला तुम्ही बोलण्यापासून का अडवत आहात? ही पद्धत योग्य नसून प्रथम महापालिका काय आहे, हे शिकून घ्या. जरा वयाचा विचार करा. काल निवडून आल्या आणि आम्हाला बोलण्यापासून रोखून बसायला लावता आहात. मला असे बोलताना थांबवायचे नाही. महापालिकेच्या पद्धती काय आहेत, ते शिका. पक्षश्रेष्ठींशी कसे बोलायचे, ते शिका. एवढे होऊनही वरून तुम्ही चुकीचे वागत आहात हे बोलता आणि पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करता. तुमची सभा कशी चालते, तेच पाहतो. तुमच्या सर्वांच्याच चौकशा लावतो," असे सांगून संतापून सभात्याग केला. या गोंधळात एका महिला सदस्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर सदस्य व आयुक्तांनी शांत राहणेच पसंत केले. 

संबंधित लेख