नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवकाला खुनाच्या गुन्ह्यात अटक

नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवकाला खुनाच्या गुन्ह्यात अटक

नाशिक : कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकांच्या विवाहास पालकमंत्री, शहराध्यक्षांनी हजेरी लावल्यावर होणाऱ्या विविध प्रश्‍नांच्या सरबत्तीवर मौन बाळगून असलेल्या शहर भाजप पुन्हा एकदा अडचणीत आला. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याने आता नव्या वादाला तोंड द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच ही कारवाई झाली. या अटकेमुळे गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देण्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

शहरातील अवैध दारूचे साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाडी परिसरात काल रात्री पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल फौजफाट्यासह दाखल झाले होते. त्यांनी या भागाची कसून झाडाझडती केल्यावर शेट्टी हाती लागला. काल दिवसभर पोलिस त्याच्या मागावर असताना शेट्टी मात्र महापालिकेच्या महासभेच्या निमित्ताने भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून चर्चेत रंगला होता. सायंकाळी पोलिस मागावर असल्याची कुणकूण त्याला लागली. मात्र पोलिसांनी त्याला पसार होण्याची संधी दिली नाही. 

पंचवटी भागातील पाथरवट लेन येथे दोन दिवसांपूर्वी एका टोळीने तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अटक केलेल्या कुंदन परदेशी, राकेश शेट्टी यांची चौकशी केल्यावर त्यांनी 2015 मध्ये 1 ऑक्‍टोबरला जालिंदर अंबादास उगलमुगले याचा इगतपुरी येथे खून केल्याची कबुली दिली. शेट्टीच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे त्यांनी सांगितल्याने शेट्टीला अटक झाली. 

गेले काही दिवस शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून त्यात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उघड सहभाग दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यासह विविध पदाधिकारी कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांचा नातेवाईक जग्गी कोकणी यांच्या कुटुंबीयांच्या विवाह समारंभास उपस्थित राहिले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय टीका होत आहे.

यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्तांसह सहा पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पालकमंत्री महाजनदेखील या प्रकरणाचा नेमका खुलासा करू शकलेले नाही. उद्या (ता.28) मुख्यमंत्री फडणवीस शहराच्या दौऱ्यावर येत असल्याने विरोधकांना शेट्टी अटकेचा मुद्दा आयताच मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com