narendra patil on udyanraje | Sarkarnama

मर्द आहे म्हणूनच मिशा पिळतो: नरेंद्र पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

मिशांना पिळ, माथाडींना पिळ मग सगळं गिळ...अशी टीका उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांच्यावर करून त्यांना कुठेही कधीही गाठू शकतो, असा इशारा दिला होता. 

सातारा : उदयनराजेंना मी अनेक प्रश्‍न विचारले पण त्यांनी एकाही प्रश्‍नाचे उत्तर दिलेले नाही. संसदेत त्यांनी किती प्रश्‍न विचारले, किती प्रश्‍नांना उत्तरे दिली, किती काळ ते संसदेत उपस्थित राहिले. तसेच सातारकरांच्या प्रश्‍नावर त्यांनी किती आंदोलने केली, याची खासदारांनी उत्तरे द्यावीत, असे आव्हान भाजप, शिवसेना युतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आज येथे उदयनराजेंना दिले. 

माझ्या वडीलांच्या मिशा होत्या. मलाही मिशा आवडतात कारण ही मिशा ही मर्दाची निशाणी आहे. मी मर्द आहे म्हणूनच मिशा पिळतो, असे ते म्हणाले.

उदयनराजेंनी दिलेल्या आव्हानाला प्रतिउत्तर देण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ऍड. भरत पाटील, हणमंत चवरे, आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले,  माझी समोरा समोर यायची तयारी आहे. त्यांनीच वेळ आणि ठिकाण जाहीर करावे. सातारा जिल्ह्यातील लोकांना परिवर्तन हवे आहे. मला खात्री आहे की 23 मे रोजी माझाच विजय होणार आहे. त्यामुळे मी उदयनराजेंना पाडणारच आहे. 

नरेंद्र पाटील म्हणाले, माथाडींना मी काय पिळले याचा खुलासा खासदारांनी करावा. उलट त्यांनी साताकरांसाठी काय आंदोलने केली, आजपर्यंत संसदेत त्यांनी किती प्रश्‍न विचारले. किती प्रश्‍नांना उत्तरे दिली. तसेच सातारकरांचे प्रश्‍न सोडविणसाठी त्यांनी संसदेत किती तास प्रश्‍न विचारले, याची माहिती त्यांनी संपूर्ण शुध्दीत राहून द्यावीत. पार्थ पवार यांच्या मावळ येथील सभेत त्यांनी चांगली मिमिक्री केली. ते खरोखरच मिमिक्री करणारे खासदार आहेत. जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध खात्यातून विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. हा निधी आपणच आणल्याचे ते सांगत आहे. त्यांनी मागील दोन निवडणुकीत प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यांतील किती कामांची पूर्तता केली ते सांगावे.छत्रपतींनी उभारलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी काय केले. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोदींनी निधी दिला. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अपूर्ण असून या कामासाठी तुम्ही पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला. आपण स्वत:ला रयतेचे राजे समजता तर सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना टोलनाका सवलत का मिळवून दिली नाही. उलट टोलचा झोल केला, असा आरोप त्यांनी केला. 

संबंधित लेख