Narendra Modi will have to face tough time | Sarkarnama

नरेंद्र मोदींचे येणार बुरे दिन : भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकित

श्रीधर ढगे: सरकारनामा ब्युराे
शनिवार, 29 एप्रिल 2017

घटामधील सुपारी पानावर बाजुला पडलेली होती व पान दुमडले गेले असून त्यावर माती होती. त्यामुळे राजा कायम राहणार आहे. गादीवर माती असल्याने राजावर राजकीय संकटे येऊन राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे. असे भाकित वर्तविण्यात आले. घटामध्ये ठेवलेली करंजीचे (कानोला) तुकडे झालेले आढळले. त्यामुळे देशावर यंदा आर्थिक संकट ओढवणार आहे. काही वर्षांपूर्वीही आर्थिक संकटाचे भाकित खरे ठरले होते.

खामगाव: तिनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकित शनिवारी (ता.29) पहाटे साडेपाचच्या सुमारास सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी जाहीर केले.

अतिवृष्टीच्या आपत्तीसह यंदा पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. घुसखोरी वाढणार असून सैनिकांची धावपळ होईल.

शिवाय राजा अर्थात पंतप्रधान कायम राहणार असले तरी देशासमोरील आर्थिक संकाटांची टांगती तलवार पाहता नरेंद्र मोदींसाठी ‘बुरे दिन’ येण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत. 

अक्षय तृतीयेच्या  मुहूर्तावर गेल्या ३०० वर्षांपासून भेंडवळ  येथे घटमांडणीच्या माध्यमातून राजकीय , आर्थिक, शेती विषयक भाकीत केले जाते . विदर्भात या भाकितांविषयी शेतकरी आणि नागरिकांमध्ये नेहेमी उत्सुकता असते . 

 भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली. सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जय जयकार करीत घटाची आखणी करण्यात आली. 

यंदाच्या पावसाळ्यात पहिला महिना साधारण आणि लहरी स्वरूपाचा राहील. दुसरा, तिसरा महिना चांगला पाऊस, तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस सांगितला आहे. 

देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी वाढणार असून परकीय घुसखोरीच्या डोकेदुखीचे आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे सैनिकांची धावपळ वाढणार असल्याचे पुंजाजी महाराज यांनी अंदाजात म्हटले आहे. 

देशावरील संकटांची मालिका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोंदीसाठी हे वर्ष बुरे दिनाचे असल्याचे भाकितही वर्तविण्यात आले आहे.

 येत्या हंगामामध्ये मृग नक्षत्रात जून महिन्यामध्ये लहरी पाऊस, जुलै महिन्यात थोडा जास्त, आॅगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडणार असला तरी अवकाळी स्वरूपाचा अंदाज आहे. 

विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीचे पीक यंदा चांगले येणार असल्याचे सांगण्यात आले. घटामध्ये अंबाडी हे कुलदैवताचे प्रतिक मानण्यात येते. त्यानुसार घटामध्ये अंबाडी ही विखुरली असल्याने कुलदेवतेचा प्रकोप राहील. मोठी संकटे ओढावणार.

 खरीपात पिकांचा राजा समजल्या जाणाऱ्या ज्वारीचे पीक चांगले येईल. घटात ज्वारीचा दाणा घटामध्ये आत बाहेर गेल्याने पिकाची नासाडी होण्याचे संकेत आहेत. ज्वारीचे पीक चांगले तर खरीपाची पिके चांगली असा एक अंदाजही असतो. यावेळी म्हणूनच खरीपाचा हंगाम चांगला राहण्याचे भाकित आहे. 

तुरीचे पीक चांगले येईल. शिवाय तुरीचा दाणा 32 बोटे आत तसेच घट ओलांडून बाहेर गेल्याने भावात तेजीमंदी राहील. मूग विखुरल्याने पीक चांगले येईल. उड‌दाचे पिकही चांगले येईल मात्र आत फैलल्यामुळे नासाडी संभवते. त‌िळाचे पीक साधारण मात्र पिकाची खूप नासाडी संभवते.

 भादली जास्त प्रमाणात असल्याने गंभीर रोगराईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बाजरी चांगली, जवस ठिक राहिल. गहू घटात आतबाहेर फैलल्याने भावात तेजीचा अंदाज सांगितला आहे. गव्हाच्या पिकावरून रब्बी हंगामाचा अंदाज वर्तविण्यात येतो. गव्हाचे पीक साधारण चांगले असल्याने रब्बी हंगामही साधारण चांगला राहिल. 

मोदींवर येणार संकट

घटामधील सुपारी पानावर बाजुला पडलेली होती व पान दुमडले गेले असून त्यावर माती होती. त्यामुळे राजा कायम राहणार आहे. गादीवर माती असल्याने राजावर राजकीय संकटे येऊन राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे. असे भाकित वर्तविण्यात आले. घटामध्ये ठेवलेली करंजीचे (कानोला) तुकडे झालेले आढळले. त्यामुळे देशावर यंदा आर्थिक संकट ओढवणार आहे. काही वर्षांपूर्वीही आर्थिक संकटाचे भाकित खरे ठरले होते.

घुसखोरीत वाढ
करडी संरक्षण व्यवस्थेचे प्रतिक आहे. त्यामुळे घटामध्ये एक दाणा सहा विता बाहेर तर एक दाणा बारा बोटे आत आल्याने संरक्षण व्यवस्थेवर ताण पडणार आहे, असे सांगण्यात आले. मसुरला शत्रुचे प्रतिक मानत असल्याने एक दाना घटात आत असल्याने घुसखोरी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र संरक्षण व्यवस्था मजबूत राहणार आहे. घटातील वडा, भजा, पापड तुटलेले असल्याने चव नाहीशी होईल व अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होईल.

संबंधित लेख