Narendra modi is interested in speeches than action : Jignesh Mewani | Sarkarnama

मोदींची उपाय योजनांपेक्षा भाषणबाजीच जास्त : जिग्नेश मेवानी 

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुजारीची धमकी
जिग्नेश मेवानी म्हणाले की, मला व उमर खालिदला जीवे मारण्याची धमकी रवी पुजारी देत आहे. याची तक्रार करूनही पोलिसांकडून दखल घेतली जात नाही. फक्त गुजरातमध्ये एक पोलिस माझ्यासाठी तैनात करण्यात आला आहे; पण गुजरात बाहेरच्या सुरक्षेचे काय?

मुंबई  : "देशातील नागरिकांचे प्रश्‍न वाढत चालले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करीत सुटतात. त्यांची भाषणबाजी म्हणजे केवळ जुमल्यांचा बाजार आहे', अशी टीका आमदार जिग्नेश मेवानी यांनी बुधवारी (ता. 15) येथे केली.

'तिरंगा उठाव भाजप हटाव' या रॅलीसाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी मुंबईत आले होते. शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. 'लोकांचे दोस्त' या संघटनेकडून हा कार्यक्रम घेण्यात आला.

 या वेळी मेवानी म्हणाले की," आज देशात अनेक समस्या आहेत; मात्र सरकार काहीही करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतात; मात्र देशासमोर असलेल्या प्रश्‍नांवर काहीही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या, तसेच दोन कोटींना रोजगार, कुपोषण, कामगारांचे प्रश्न यावर मोदी काही बोलत नाहीत. भाषणात जुमलेबाजी सुरू आहे. लोकांनी प्रश्‍न विचारले, तर गोहत्येचा मुद्दा समोर आणला जातो."

" मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या असत्या, तर आरक्षणासाठी लोकांना आज रस्त्यावर उतरावे लागले नसते," अशी टीका या वेळी मेवानी यांनी भाजप सरकारवर केली.

 

संबंधित लेख