Narendra Maharaj gave blessings to Bankar while sSattar was waching | Sarkarnama

सत्तार पहात होते पण नरेंद्र महाराजांनी घातला भाजपच्या बनकरांच्या गळ्यात हार

जगदीश पानसरे 
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नरेंद्र महाराजांनी कृपाशिर्वादाचा हार भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या गळ्यात टाकल्यामुळे " यंदा सत्तार शेठचे काय होणार ?''  अशी चर्चा त्यांच्या विरोधकांनी सुरु केली आहे . 
 

औरंगाबादः सिल्लोड-सोयगांवचे विद्यमान कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वधर्मीय आणि साधू-संतांच्या आशिर्वादाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे सत्तार करवीरपीठाच्या शंकराचार्यापासून अनेक साधू-संतांच्या चरणी लीन होतांना दिसले. 

सलग दोनवेळा आमदार होण्यात या धार्मिक गुरुचे आशिर्वाद आणि पाठबळ महत्वाचे ठरले होते. नव्या वर्षात होणाऱ्या सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा या पार्श्‍वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी नुकतीच नरेंद्र महाराजांची एका धार्मिक सोहळ्यात भेट घेतली आणि त्यांच्या सांधू-संताविषयीच्या प्रेमाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. 

सिल्लोड शहरात नुकतेच नरेंद्राचार्य महाराजांच्या उपस्थितीत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात महाराजांचे आशिर्वाद आणि आर्शिवचन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील त्यांचे भक्त आले होते. किर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभाला तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. 

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र महाराजांचा तालुक्‍यातील भक्त परिवार पाहता सत्तार यांनी महाराजांना आशिर्वाद देण्याचे साकडे घातले होते. त्यांच्या कृपाशिर्वादानेच सत्तार यांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जाते. तेव्हापासून सत्तार यांनी महाराजांवरील श्रध्दा अधिकच वाढली. 2014 मध्ये देशभरात निर्माण झालेल्या मोदी लाटेतही सत्तार तरले. यात देखील सांधू-संताची भूमिका महत्वाची मानली गेली. 

भाजपच्या बनकरांच्या गळ्यात हार.. 

अशावेळी मतदारसंघात नरेंद्र महाराजांचे किर्तन सुरू असतांना अब्दुल सत्तारांनी त्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले नाही तर नवलच. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तार यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले सुरेश पाटील बनकर आणि सत्तार दोघे एकाच वेळी नरेंद्र महाराजांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेण्यासाठी गेले. 

अब्दुल सत्तार यांनी नरेंद्र महाराजांच्या गळ्यात हार घातला, त्यांच्या पाया पडले आणि दर्शनासाठी शेजारी उभे ठाकले. तेवढ्यात भाजपचे सुरेश बनकर देखील व्यासपीठावर आले. त्यांनीही महाराजांचे चरणस्पर्श करत दर्शन घेतले. कृपाशिर्वाद म्हणून नरेंद्र महाराजांनी आपल्या गळ्यातील हार काढून तो बनकर यांच्या गळ्यात टाकला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली. 

गेल्या दोन निवडणुकांपासून नरेंद्र महाराज आशिर्वादाचा हार सत्तार यांच्या गळ्यात टाकत आले होते. त्यामुळे कठीण परिस्थीतही सत्तार यांनी बाजी मारली होती. यावेळी चित्र काही प्रमाणात बदलले आहे. जानेवारी मध्ये सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. 

गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून सत्तार यांची एकहाती सत्ता नगरपालिकेवर आहे. यावेळी सत्तार आणि त्यांचे नगराध्यक्ष पुत्र समीर यांनी खिंडीत पकडण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, एमआयएम हे सगळे पक्ष एकवटले आहेत.

नगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा कायम ठेवण्याच्या आव्हाना सोबतच सत्तार यांना आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजप विरोधात लढतांना संघर्ष करावा लागणार आहे. अशावेळी नरेंद्र महाराजांनी कृपाशिर्वादाचा हार भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या गळ्यात टाकल्यामुळे " यंदा सत्तार शेठचे काय होणार ?  अशी चर्चा त्यांच्या विरोधकांनी सुरु केली आहे . 
 

संबंधित लेख