नारायण राणेंचे सारथी, आमदार ते कडवे विरोधक ! 

नारायण राणेंचे सारथी, आमदार ते कडवे विरोधक ! 

मुंबईतील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते हे दोन दशकापूर्वी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सारथी होते. राणेंनीच त्यांना राजकारणात आणले. शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र, या दोघांमध्ये आज गुरू-शिष्याचे नाते राहिले नाही.

पुलाखालून बरे पाणी वाहून गेले. राणे स्वत: पक्षाबाहेर गेले. मात्र काते त्यांच्यासोबत गेले नाहीत. शिवसेनेचा भगवा त्यांनी खांद्यावरून खाली ठेवला नाही. मात्र या दोघांमधील राजकीय हाडवैर संपलेलं नाही. साहेबांचा चालक, शाखाप्रमुख, नगरसेवक ते आमदार हा काते यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 

मुंबईतील अणूशक्तीनगर मतदार संघाचे काते हे नेतृत्व करतात. 1995 पूर्वी काते हे राणे यांचा उजवा हात होते. त्यांचे वाहन चालविण्यापासून ते त्यांच्या घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत कातेंचा सहभाग असे. ते राणे कुटुंबाचे सदस्यच बनले होते. आपल्या या अत्यंत विश्वासू साथीदाराला राणे वीस वर्षापूर्वी प्रथम शिवसेनेचे शाखाप्रमुख बनविले. त्यानंतर 1997च्या मुंबई महापालिका निवडणुकीत चेंबूर -घाटला प्रभागातून नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि निवडूनही आणले. 

नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या चेंबूर- घाटला परिसरात त्यांच्यापेक्षा कातेंचीच लोकप्रियता अधिक वाढू लागली. कातेंनी मतदारसंघातील घराघरांत मानाचे स्थान मिळविले. याच दरम्यान,राणे यांची शिवसेनेत झपाट्याने प्रगती होत होती. विरोधी पक्षनेत्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत राणे यांचा वेगवान प्रवास सुरू होता. ही प्रगती होत असताना राणे यांचे आपल्या बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष होत गेले. 

2002 मध्ये महापालिका मतदारसंघाची पूनर्रचना झाली, आणि त्यात काते यांचा मतदारसंघ अनेक तुकड्यात विभागला गेला. त्यामुळे राणे यांनी काते यांना 2002 च्या महापालिका निवडणुकीची तिकीट दिले नाही. त्यांनी लगतच्या मतदारसंघातील तिकीट मागितले. पण, त्या ठिकाणी विठ्ठल लोकरे यांना तिकीट देण्यात आले होते. आपल्याला तिकीट दिले नसल्याचा राग काते यांना आला, त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करीत लोकरे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली.

एवढेच नव्हे तर शेजारच्या मतदारसंघात पत्नीलाही शिवसेनेच्या विरोधात रिंगणात उतरविले. काते दांपत्याचा पराभव करण्यासाठी राणे यांनी जंगजंग पछाडले. प्रचारसभा घेतल्या. मतदारांनी काते यांच्या पारड्यात झुकते माप टाकले. काते दांपत्य भरघोस मताने निवडून आले. हा पराभव राणे यांना जिव्हारी लागला. त्यानंतर राणे व काते यांचे संबंध दुरावले ते कायमचेच. 

2005 मध्ये शिवसेनेने राणे यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी  तुकाराम काते आणि मंगला काते यांना शिवसेनेमध्ये सन्मानाने प्रवेश दिला. काते यांची स्थानिक जनतेमधील लोकप्रियता आणि नारायण राणे यांचे कट्टर विरोधक यामुळे उद्धव ठाकरे यांनी 2005 नंतर काते यांना अधिक जवळ केले.

एवढेच नव्हे तर त्यांना बढती देत विधानसभा निवडणुकीचे दोन वेळा तिकीट दिले. पहिल्या वेळी काते यांचा पराभव झाला. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिक यांचा पराभव करून काते आमदार झाले. 

दुरावलेले संबंध सुधारले नाहीत : काते 
याबाबत तुकाराम काते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "" नारायण राणे यांच्याशी दुरावलेले संबंध इतक्‍या वर्षानंतरही सुधारलेले नाहीत. आम्ही एकमेकांशी बोलत नाही. त्यांच्याशी बोलण्याची माझी इच्छाही नाही. मी शिवसेनेत आहे आणि शिवसेनेशीच एकनिष्ठ राहणार. 

कातेंशी संवाद नाही : नितेश राणे 
नितेश राणे म्हणाले,"" तुकाराम काते हे सुरूवातीला आमच्या साहेबांचे वाहनचालक होते. नंतर साहेबांनीच त्यांना राजकारणात आणले. पण आता इतक्‍या 
वर्षानंतर आम्हा कुटुंबियांचा त्यांच्याशी कसलाही संवाद राहिलेला नाही. संवाद साधण्यासाठी त्यांनीही आणि आम्हीही कधी प्रयत्न केले नाहीत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com