narayan rane redi port | Sarkarnama

रेडी पोर्टचे गौडबंगाल; भाजपची भूमिका राणेंच्या सोयीची! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नितेशबाबत त्यांची काय भूमिका ? 
जिल्ह्यातील ठेकेदारांकडून पालकमंत्री, खासदार आणि मी हप्ते घेतो असे आरोप राणेंनी केले. असे आरोप आपल्यावर असल्याची एक तरी तक्रार आल्यास आम्ही सर्वजण राजीनामे देवू; मात्र नितेश राणे यांनी केसवाणी नावाच्या हॉटेल व्यावसायिकाला धमकी दिली. तशी त्यांच्या विरोधात तक्रार आहे. मग आता त्यांच्याबाबत श्री. राणे काय भूमिका घेतील असा प्रश्‍न करुन निलेश राणे खालच्या पातळीवर जावून बोलत आहेत. यात त्यांचे सातत्य राहिल्यास निवडून येणे सोडाच डिपॉझीट सुद्धा राहणार नाही असे नाईक म्हणाले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  : नारायण राणेंचा भाजपा प्रवेश निश्‍चित झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात रेडी बंदराबाबत न्यायालयात दाखल असलेली याचिका मागे घेण्याची मागणी शासनाकडून न्यायालयात करण्यात आली आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज येथे केला. 

श्री. राणे हे भाजपात गेले तर शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. आता कॉंग्रेसला कोणी वाली नसल्यामुळे राणेंसोबत काम करण्यास इच्छुक नसलेले अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येणार आहेत, असा दावा सुध्दा यावेळी त्यांनी केला. 
श्री. नाईक यांनी आज येथे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, सागर नाणोसकर, गौरव सावंत, गजा नाटेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री. नाईक म्हणाले, राणेंचा भाजप प्रवेश आता निश्‍चित झाला आहे. गेले अनेक महिने त्यांचा हा प्रवास सुरू होता; मात्र आपले राजकीय भविष्य उध्वस्त होवू नये म्हणून त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. काही झाले तरी ते सत्ताधारी पक्षाबरोबर राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे जनतेचे हित नसून आपल्या मुलांचे हित त्यांच्या डोळ्यासमोर आहे. या सर्व परिस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण सरकारकडून रेडी पोर्टच्या विरोधात शासनाकडून दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तसे पत्र सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आले आहे; मात्र या विरोधात शिवसेनेची भूमिका असणार आहे. त्यासाठी आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडणार आहोत.

ते पुढे म्हणाले, विधानसभेत बोलत नाही, प्रश्‍न विचारत नाही असा आरोप राणेंकडून करण्यात आला होता; मात्र ते आता विधानपरिषदेवर आहेत. त्यामुळे त्यांना कसे काय कळणार? तरीही त्यांनी माझी दखल घेतली. याबाबत मी त्यांचा आभारी आहे. 

कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांची जबाबदारी विकास सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी योग्य पद्धतीने काम करावे. या काळात त्यांना पोलिस संरक्षण हवे असल्यास गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना देवू. कोणाला त्यांनी घाबरू नये. राणें अनेक आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करीत आहेत; मात्र शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये जाताना सोबत असलेले सुभाष बने, शंकर कांबळी, गणपत कदम असे अनेकजण आज अडगळीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणाऱ्यांनी हा धडा घ्यावा, असेही नाईक म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख