राणे कोकणातच; दिल्लीला गेल्याची अफवा 

महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राणेंना भाजपमध्ये घेण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातीलभाजपचा एक बडा नेता अद्याप राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी अनुकूल नाही. राणे यांना घ्यायचे तर मंत्रिमंडळात कोणते खाते द्यायचे, यावरूनही वादाची वात पेटवून देण्यात आल्याची चर्चा आहे.
राणे कोकणातच; दिल्लीला गेल्याची अफवा 

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी (ता. 17) पार पडलेल्या बैठकीपूर्वी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते. त्याच संदर्भात राणे हे दिल्लीला गेले असल्याची बाबही समोर येत होती. मात्र, तसे काहीही घडले नसून नारायण राणे कोकणातच असल्याची माहिती राणेंच्या निकटवर्तीयांनी 'सरकारनामा'ला दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा राणे स्वतः कोकणात प्रेस घेऊन करतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली. 

महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राणेंना भाजपमध्ये घेण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील एक बडा नेता अद्याप राणे यांच्या प्रवेशासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. या नेत्याने होकार दिला की राणेंचा प्रवेश सुकर होईल, असे सांगण्यात येते. 

राणे भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली. त्यामुळे राणे यांचा भाजप प्रवेश केव्हाही होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

नारायण राणे सध्या कोकणातच असून आपल्या समर्थकांशी चर्चा करत आहेत. यापूर्वीच राणे साहेब जातील तिथे आम्ही जाऊ असे त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले होते. आपल्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर राणे दिल्लीला जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र `दिल्ली`ने केव्हाच ग्रीन सिग्नल दिला असून, आता या विषयासाठी तेथे परत जाण्याची गरज नसल्याची राणे यांची भूमिका असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.  

सध्या कोकणात शिवसेनेच पारडे जड असून राणेंनी भाजप प्रवेश केल्यास सर्वाधिक फटका सेनेलाच बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपले स्थान भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भाजप राणेंबाबत काय भूमिका घेते यावरच भाजप पक्षाचे कोकणातील भवितव्य ठरणार आहे. 

कॉंग्रेसमध्ये गेले वर्षभर नाराज असलेले नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. राणेंनी याचा स्पष्ट शब्दांत कधीच इन्कार केला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील अंतर्गत संघर्ष गेला काही काळ सुरू आहे. मात्र चव्हाण यांनी अलीकडे राणेंच्या विरोधात जाहीर वक्तव्य केले नव्हते. चार दिवसांपूर्वी मात्र त्यांनी "ज्यांना पक्ष सोडून जायचेय त्यांनी खुशाल जावे,' असे सूचित वक्तव्य केले होते. याला राणेंच्या गोटातूनही उत्तर देण्यात आले. 

राणे गेला महिनाभर अधूनमधून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत होते. आमदार नीतेश राणे यांचाही जिल्ह्यात दीर्घकाळ मुक्काम होता. आठ-दहा दिवसांपूर्वी राणे यांनी कुलदैवत असलेल्या कांदळगाव येथे श्री देव रामेश्‍वराचे दर्शनही घेतले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता एखादा मोठा निर्णय घेण्याआधी ते कांदळगावमध्ये कुलदैवताच्या दर्शनाला आवर्जून जातात. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्‍चित झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपमधील हालचाली पाहता राणे यांचा प्रवेश निश्‍चित मानला जातो. 

वैद्यकीय महाविद्यालय टर्निंग पॉइंट? 

नारायण राणे यांच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय पडवे येथे सुरू होत आहे. राणेंसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऑगस्टमध्येच याचे उद्‌घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपमधील बडा नेता हजेरी लावणार अशी चर्चा होती. या महाविद्यालयाचे उद्‌घाटन हा सिंधुदुर्गाची नवी राजकीय समीकरणे मांडणारा सोहळा ठरेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com