Narayan Rane desires ministerial berth BJP offers Rajyasabha | Sarkarnama

राणेंना हवे मंत्रीपद ,भाजपने दिली राज्यसभेची ऑफर !

गोविंद तुपे : सरकारनामा न्यूज ब्युरो
गुरुवार, 1 मार्च 2018

राज्यातील मंत्रीमंडळाच्या रखडलेल्या विस्तारामुळे राणेंना मंत्रीपद केंव्हा मिळणार या प्रश्‍नाची दिशा बदलली आहे. कारण भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला राज्यसभेची ऑफर दिली असल्याची माहिती नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र शहा यांनी दिलेल्या या ऑफरचा विचार करून निर्णय घेणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबई :  राज्यातील मंत्रीमंडळाच्या रखडलेल्या विस्तारामुळे राणेंना मंत्रीपद केंव्हा मिळणार या प्रश्‍नाची दिशा बदलली आहे. कारण भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला राज्यसभेची ऑफर दिली असल्याची माहिती नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र शहा यांनी दिलेल्या या ऑफरचा विचार करून निर्णय घेणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले आहे. 

नारायण राणे यांची अवस्था जायचे मुंबईला आणि ऑफर दिल्लीची अशी झाली आहे . खरेतर भाजपाशी मैत्री जमल्यानंतर कॉंग्रेसला नारायण राणे यांनी रामराम ठोकला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणाही राणेंनी केली. पण मंत्री पदाचे आश्‍वासन देऊन भाजपने राणेंना आपल्या गोटात खेचले होते. पण भाजपाकडून आश्‍वासनांची पुर्तता होत नसल्याने माझा अंत पाहू नये अशी भूमिका काही दिवसापुर्वी राणे यांनी घेतली होती. 

त्यानंतर मुख्यमंत्र्यासोबत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही बैठका झाल्या पण त्यातून ठोस निर्णय झाला नाही. मात्र बुधवारी राज्यातील भाजप नेत्यांची दिल्लीत एक बैठक पार पडली. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता, राज्यातील रिक्त होत असलेल्या सहा राज्यसभेच्या जागांपैकी एका जागेवर उमदेवारी देण्याचा विचार करीत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राणेंना सांगितले आहे. अशी माहिती राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच या भाजपाच्या या ऑफरचा विचार करूनच निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे नारायण राणे यांच्या दिल्ली दौऱ्यात  कॉंग्रेस आमदार नितेश राणेही सोबत होते. पण  नितेश राणे यांनी आपण वडिलां बरोबर दिल्लीला गेलि पण अमित शाह यांना भेटलो नाही असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे . 

भाजपच्या गोटातून नारायण राणे यांच्याविषयी सातत्याने संभ्रमित करणारे संकेत दिले जात आहेत . सर्वप्रथम भाजपने नारायण राणे यांना आपल्या पक्षाच्या तंबूत घेतले नाही तर वेगळ्या स्वतंत्र पक्षाचा तंबू उभारायला लावला . खरे तर भाजपने  स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप हे दोन्ही पक्ष भाजपमध्ये सामील व्हावेत यासाठी अप्रत्यक्षपणे बरेच प्रयत्न केले आहेत .

असे असताना  नारायण राणे यांना थेट भाजप मध्ये का घेतले नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा  आहे . मंत्री झाल्यावर विधान परिषदेवर किंवा विधान परिषदेवर  सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक असते . आधी विधान परिषदेच्या जागा रिकाम्या नाहीत म्हणून मंत्रीपद  राणेंपासून दूर राहिले . आता अचानक राज्यसभेचा गुगली टाकून भाजपने राणेंची सत्वपरीक्षा चालवली आहे असे दिसते . 

राज्यसभेच्या ऑफर शिवाय नितेश राणे यांच्यासाठी भाजप काही वेगळे पॅकेज देणार का आणि त्याबाबत काही चर्चा झाली का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही . येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात भाजपाला नारायण राणे यांच्या मुलुख मैदानी तोफेची आवश्यकता निश्चित भासणार आहे .

सध्याही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या विरोधात आक्रमक हल्ले चढवित  असताना भाजपचे मंत्री जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात कमी पडत असल्याचे  चित्र आहे . असे असताना भाजप नारायण राणे यांना शिवसेनेच्या दबावामुळे  दूर ठेवत आहे का याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे . 

 

संबंधित लेख