Narayan Rane to declare his future plan on 21 | Sarkarnama

मला डिवचले तर माझी ताकद दुप्पट : नारायण राणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

"राणेंना कोण धक्का देणार, आता कुठल्या दुकानात कॉंग्रेस मिळते ते मला दाखवा. दिल्ली असो वा महाराष्ट्र मी आत असेन तर कधी बाहेर जाणार, याची आपले नेते वाट बघतात. ते इतके मला घाबरतात. कारण मी सत्य बोलतो. त्यांना असे जिवंत निखाऱ्यासारखे कार्यकर्ते नकोत. निवृत्त झालेले विकास सावंतांसारखे हवे आहेत. "
-नारायण राणे 

कुडाळ   : " अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्ष संपवत आहेत. या पुढे मी राजकारणात राहणार. त्याचबरोबर माझी मुलेही राजकारणात राहतील. येणारी ग्रामपंचायत आम्ही समर्थ विकास पॅनेलच्या झेंड्याखाली लढवू. माझा पुढचा निर्णय घटस्थापनेला (ता. 21) जाहीर करेन" , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले. 

कॉंग्रेसने जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या निर्णयानंतर राणेंनी आज गोव्यातून कुडाळपर्यंत रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

 राणे म्हणाले, "दत्ता सामंत आजही कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. राणे काढत नाहीत तोपर्यंत कार्यकारिणी बरखास्तीच काय कोणताही निर्णय प्रदेश कॉंग्रेस घेऊ शकत नाही. तुमची सर्वांची साथ मला आहे. आज कार्यकर्त्यांचा वेगळा आवेग, जोश पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसांनी निखाऱ्यावरची राख काढल्यानंतर तो कसा धगधगता असतो, हे पाहायला मिळाले. अशोक चव्हाण आणि इतरांना राणे कळलाच नाही. मला डिवचले तर माझी ताकद दुप्पट होते. अनेकांनी मला डिवचायचा प्रयत्न केला. मी आहे तिथेच आहे; पण डिवचणारे कुठे दिसत नाहीत?'' 

ते म्हणाले, "जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी का बरखास्त केली, हेच कळत नाही. अशोक चव्हाण पक्ष संपवत आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सिंधुदुर्गाच्या तोडीचे काम त्यांच्या जिल्ह्यात तरी होते का? अशा व्यक्तीला कार्यकारिणी रद्द करण्याचा काय अधिकार? भ्रष्टाचाराचा आरोप असलेला विरोधकांवर बोलू शकतो का? चव्हाणांनी कॉंग्रेसचा बट्ट्याबोळ केला. विरोधी पक्षाचे अस्तित्वच सध्या नाही. कॉंग्रेस संपविण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे.'' 

आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट करताना श्री . राणे म्हणाले "माझा निर्णय घटस्थापनेला 21 तारखेला कुडाळमध्ये जाहीर करणार. पितृपक्षात मोठा निर्णय नको. मी राजकारणात राहणार आणि माझी दोन्ही मुलेही राजकारणात राहतील. आम्ही एकटे नाही. महाराष्ट्रभरातील लोक माझ्या निर्णयाची वाट पाहत आहेत. असे साथ देणारे लोक हीच माझी ताकद आहे.'' 

 

संबंधित लेख