narayan rane comes forward to help CM | Sarkarnama

फडणवीसांच्या मदतीला धावले नारायण राणे : मराठा आंदोलन थांबविण्याचे आवाहन

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचा उद्रेक झाला असून हे आंदोलन चिघळू नये, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेवरून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असा दावा नारायण राणे यांनी केला.

पुणे : आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचा उद्रेक झाला असून हे आंदोलन चिघळू नये, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेवरून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असा दावा नारायण राणे यांनी केला.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातून कसा मार्ग काढावा यासाठी बैठका सुरू आहेत. राणे यांनी मात्र मध्यस्थी करण्याची भूमिका जाहीर करत सरकारशी चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठा समाजाच्या नेत्यांशीही राणे यांनी याबाबत बैठका घेतल्या.
  
या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार अनुकूल आहे. मात्र जाळपोळ, आंदोलन थांबली पाहिजे, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. 

हे सरकार आरक्षण देण्यासाठी  सक्षम आहे. राणे समितीच्या अहवालात यासंबंधीची तरतूद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी मी याच संदर्भात आज चर्चा केली. मुख्यमंत्री यासाठी अनुकूल आहेत, उग्र आंदोलने आणि हिंसक आंदोलने थांबली तर चर्चा सुरू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसात मराठा नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट मी घडवून आणेन आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मदत करेन असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर प्रतिक्रिया नाही

मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे का? त्यावर राणे यांनी स्पष्ट केले की मी इथे आरक्षण आणि आंदोलन या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलो आहे. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही.  न्यायालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रात नेमके कोणते मुद्दे अधोरेखित करावेत या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याचेही राणे म्हणाले. मराठा आंदोलकांनीही लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, कुणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असे आवाहनही राणे यांनी केले. 
 

संबंधित लेख