narayan rane and marathawada | Sarkarnama

राणेंना मराठवाड्यातून पाठिंब्याची शक्‍यता कमीच !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या चार जिल्ह्यात प्रामुख्याने राणेंना मानणारे कार्यकर्ते होते. पण साधारणतः एक तप नारायण राणे यांनाच कॉंग्रेस पक्षाने झुलवत ठेवले, तिथे समर्थकांना कोण विचारणार असा प्रश्‍न होता. परिणामी राणेंचे मराठवाड्यातील आपल्या पाठिराख्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मराठवाड्यातून राणेंच्या पदरात फारसे काही पडेल अशी शक्‍यता नाही. 

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले आमदार नारायण राणे महाराष्ट्राचा दौरा करुन पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांच्यावर अन्याय झाला अशी भावना असणारे मराठवाड्यातील काही माजी खासदार, आमदार, महापौर व शिवसैनिक त्यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यापैकी काहीजणांनी इतर पक्षांची वाट धरली, तर काहींनी स्वःताचे उद्योग, व्यवसाय सांभाळत राणेसमर्थक एवढाच काय तो राजकारणाशी संबंध ठेवला. औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या चार जिल्ह्यात प्रामुख्याने राणेंना मानणारे कार्यकर्ते होते. पण साधारणतः एक तप नारायण राणे यांनाच कॉंग्रेस पक्षाने झुलवत ठेवले, तिथे समर्थकांना कोण विचारणार असा प्रश्‍न होता. परिणामी राणेंचे मराठवाड्यातील आपल्या पाठिराख्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मराठवाड्यातून राणेंच्या पदरात फारसे काही पडेल अशी शक्‍यता नाही. 

नारायण राणे 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा मराठवाड्यातील शिवसेना मोठ्या प्रमाणावर फुटणार असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, बीडचे सुरेश नवले, नांदेड महापालिकेतील शिवसेनेचे तत्कालीन महापौर सुधाकर पांढरे, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, पाथरी मानवतचे तत्कालीन शिवसेना आमदार माणिकराव आंबेगावकर, उस्मानाबाद जिल्ह्यातून नृसिंह सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन विनोद गपाट ही मोजकी मंडळी आपल्या समर्थकांसह नारायण राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहीली. 

कॉंग्रेसने नारायण राणे यांना महसुलमंत्री, उद्योगमंत्रीपद देत त्यांची बोळवण केली. पण मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा काही पुर्ण झाली नाही. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना त्यांना एका पत्रकाराने राणे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर विलासरांवानी मजेशीर उत्तर दिले होते. "मी दहा-बारा वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये आहे, एकदा बाहेर जाऊन देखील आलो, पण मला अजून कॉंग्रेस कळलेली नाही, तेव्हा राणेंना कॉंग्रेस कळायला आणखी बरीच वर्षे लागतील, आणि तोपर्यंत काही ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही' असे उत्तर दिले होते. विलासरावांचे हे शब्द आज खरे ठरतांना दिसत आहेत. लातूर, उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात कॉंग्रेसच्या कट्टर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिरकाव करूच दिला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात राणेंच्या कॉंग्रेस प्रवेश आणि आता सोडचिठ्ठीने काहीही फरक पडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. 

अनेकांनी आधीच साथ सोडली 
नारायण राणे यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये गेलेल्यांपैकी परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, बीडचे सुरेश नवले आणि औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे हे तिघे नारायण राणे यांच्यासोबत आज देखील आहेत. तर पाथरी मानवतचे शिवसेनेचे माजी आमदार माणिकराव आंबेगावकर आज हयात नाहीत. नांदेड महापालिकेत महापौर राहिलेले सुभाष पांढरे सध्या भाजपमध्ये आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली पण त्यांचा थोडक्‍यात पराभव झाला. औरंगाबादचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड कॉंग्रेसमधून पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतले आहेत. औरंगाबादेतील नारायण राणे यांचे समर्थक व त्यांचे आमदार पुत्र नीलेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेची धुरा सांभाळणारे तत्कालीन नगरसेवक प्रमोद राठोड हे देखील तीन वर्षापुर्वीच भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपकडून त्यांना थेट उपमहापौर करण्यात आले होते. त्यामुळे मराठवाड्यात स्वाभिमानी संघटना किंवा नारायण राणे यांची ताकद पुर्वीसारखी राहिलेली नाही. 

नारायण राणेंचा वैयक्तिक प्रश्‍न- रेंगे पाटील 
कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय हा नारायण राणे यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी कॉंग्रेस सोडणार नसल्याचे परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी सांगितले. 

साहेब जिथे, मी तिथे- सुदाम सोनवणे 
मी 19 वर्ष शिवसेनेमध्ये होतो. राणे साहेबांमुळेच मी औरंगाबादचा महापौर होऊ शकलो हे मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे राणे साहेब जिथे, आम्ही तिथे हीच माझी भूमिका असल्याचे शिवसेनेचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी सरकारनामाशी बोलतांना स्पष्ट केले. कॉंग्रेसची तत्व कधी पटलीच नव्हती, पण नेता कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे मी ही सोबत गेलो. कॉंग्रेसने आम्हाला कधी सामावून घेतलेच नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. 

संबंधित लेख