... म्हणूनच राणे "एनडीए' चे मित्र बनतील ? 

... म्हणूनच राणे "एनडीए' चे मित्र बनतील ? 

पुणे : "" ज्या कोणा पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्येय धोरणे मान्य असतील तो पक्ष "एनडीए'त येऊ शकतो,'' असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटल्याने ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष कधीही "एनडीए'चा घटक पक्ष बनू शकतो. मात्र तसे झाल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार की सत्तेलाच गुळाच्या मुंगळ्या सारखी चिकटून राहणार हा ही प्रश्‍न उरतोच. 

नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना दसऱ्याच्या मुर्हूतावर केली. आज एकट्या महाराष्ट्रात चाळीसहून अधिक पक्ष आहे. त्यामध्ये सर्वाधिक पक्ष रिपब्लिकन आहेत. आता स्वाभिमानीची नव्याने त्यामध्ये भर पडली आहे. अनेक छोट्या छोट्या पक्षाची ताकद एखाद्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. शिवसेनेसह महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि राजू शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना "एनडीए'चे मित्रपक्ष आहेत. शेट्टी यांचा पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे. शिवसेना सत्तेत असूनही मोदींच्या ध्येयधोरणाला विरोध करीत आहे. शिवसेनेचे तर एकच लक्ष्य आहे ते म्हणजे भाजप. 

शिवसेनेने भाजपविषयी घेतलेल्या पवित्र्याने भाजपची मंडळीही नाराज आहेत. फडणवीस सरकार अल्पमतात असल्याने ते शिवसेनेला सोडूही शकत नाहीत. हा पक्ष तर दररोज भाजपला इशारे देतो आहे. शिवसेनेचे कडवे विरोधक असलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला असता आणि ते मंत्री बनले असते तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली असती. त्यामुळेच राणेंना भाजपमध्ये दिला नसावा. आता राणेंनी स्वत:च्या पक्षाचीच स्थापना केली आहे. ते "एनडीए' चा घटक पक्ष बनू शकतात. जानकर, मेटे, आठवले यांच्या पाठोपाठ राणे हे नाव "एनडीए'शी जोडले जावू शकते. राणेंना "एनडीए'चा घटक पक्ष म्हणून सामावून घेण्यास भाजपला कोणतीच अडचण दिसत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री "एनडीए' बाबत जे काही बोलले त्याला महत्त्व आहे. 

राणे हे लगेच "एनडीए'त सहभागी होणार नाहीत. पण, पुढे पुढे भाजप-शिवसेनेचा सामना आणखी रंगात आलेला दिसेल. बुलेट ट्रेनवरून सध्या शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष भाजपला लक्ष्य करीत आहेत. राणे यांनी बुलेट ट्रेनला विरोध न करता विकासाला मी कधीच विरोध करीत नाही असे सुचक उद्‌गार काढून भाजपला विशेषत: मोदींच्या ध्येयधोरणाला पाठिंबा जाहीर केला आहे. म्हणजेच मोदींची ध्येयधोरणे मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्यावरच ते उद्या "एनडीए' चे मित्र बनतील. मात्र ज्या दिवशी राणे "एनडीए' चे घटक पक्ष बनतील त्यादिवशी शिवसेना कोणता निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com