पक्षांतरांच्या चर्चेने राणे यांचीच प्रतिष्ठा धोक्‍यात ?

पक्षांतरांच्या चर्चेने राणे यांचीच प्रतिष्ठा धोक्‍यात ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप कधीही होऊ शकतो, असे भाकीत करणारे कॉंग्रेसचे नेते आमदार नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीनंतर राजकीय वर्तुळात नारायण नारायण चा आवाज घुमला असून, राणेंची राजकीय कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. मी कोणत्या पक्षात जाणार हे आताच सांगू शकत नाही, असे सांगणाऱ्या राणे यांनी कॉंग्रेसमधील आपले स्थान गमावल्याची कबुली दिली आहे. सेना किंवा भाजप मध्ये प्रवेश करणार अशी गेली अनेक दिवस चर्चा असली तरी, राणे यांच्या रखडलेल्या प्रवेशामुळे त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्‍यता आहे. 
बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदाबादवारीची जोरदार चर्चा होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे हे अहमदाबादमध्ये गेले होते, या वृत्तानंतर, राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या उलटसुलट बातम्या आल्या. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्यासोबत भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे राणे यांनी आपण अहमदाबादमध्ये वैयक्तिक मिटींगसाठी गेल्याचा खुलासा केला. मला भाजपची जुनीच ऑफर आहे. आज काही नवीन नव्हते, असा मुंबईत येऊन खुलासा करावा लागला. 
आक्रमक राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नारायण राणे यांच्याबाबत सध्या उघडपणे पक्ष प्रवेशाबाबतची चर्चा उघडपणे केली जात आहे. शिवसेनेच्या मुशीतून तावूनसुलाखून तयार झालेल्या नारायण राणे यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्याने सेनेला जय महाराष्ट्र करताना, सेनेला संपविण्याची भाषा केली होती. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना, सत्तेतील महत्त्वाची पदे उपभोगत, कॉंग्रेसमध्ये आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न करताना, पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर टीका करण्याची संधी सोडली नव्हती. त्यामुळे, कॉंग्रेसमध्ये असलेले नारायण राणे हे अस्वस्थ होते. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मतदारसंघातून झालेला पराभव तसेच वांद्रे येथील पोटनिवडणुकीत हार पत्करावी लागल्याने राणे यांचे राजकीय वजन कमी झाले असे बोलले जात होते. परंतु, राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्षात सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वावर राणे यांना विधान परिषदेत पाठवून भाजपविरोधात आक्रमकपणे लढण्याची जबाबदारी दिली होती. फडणवीस सरकारला धारेवर आणण्यापेक्षा आता राणे हे सत्तेतील भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार यावरून चर्चेला ऊत आला आहे. या चर्चेमुळे कॉंग्रेसमध्ये राणे यांचे स्थान डळमळीत असल्याचे चित्र उघड झाले असून, माजी मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या राणे यांची राजकीय कोंडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
राणे यांच्यासारख्या नेत्यांची बलस्थाने असली तरी, त्याच्या उपद्रव्य मूल्याची भीती सेना आणि भाजपच्या नेत्यांना वाटत आहेत. नारायण राणे हे शिवसेनेत स्वगृही जाणार या चर्चेनंतर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले जात असले तरी, शिवसेनेतील काही मंडळींना राणे हे भविष्यात अडचणी निर्माण करतील, अशी भीती वाटत असल्याने, शिवसेनेतील राणे यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे बोलले जाते. त्याचवेळी, भाजपकडून राणे यांना ऑफर देण्यात आल्यानंतर, सेना भाजपच्या प्रवेशामुळे राणे यांना आता नक्‍की कुठे जायचं आहे हा प्रश्‍न पडला आहे. पक्ष बदलणाऱ्या नेत्यांला आपली विश्‍वासार्हता दाखविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राणे यांनी कॉंग्रेसमधील आपले स्थान घालवले आहे. आता सेना किंवा भाजपमध्ये जरी त्यांना प्रवेश देण्यात आला तरी, त्यांच्या राजकीय विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचे काम त्यांच्या हातूनच होत असल्याचे दिसून येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com