रामदास ठाकूर यांच्यावरील कारवाईमुळे `आप्पा' समर्थक नाराज

रामदास ठाकूर यांच्यावरील कारवाईमुळे `आप्पा' समर्थक नाराज

कडूस : खेड पंचायत समितीचे माजी सभापती व माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार उर्फ `आप्पा' यांचे खंदे समर्थक रामदास ठाकूर यांचे शिवसेनेतून निलंबन करण्यात आल्याने राजकीयदृष्ट्या वरवर शांत वाटणाऱ्या खेड तालुक्यात राजकीय उलथापालथीची चक्रे वेगाने फिरू लागली आहे.

ठाकूर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना 'आप्पा' समर्थकांची झाल्याने ते शिवसेनेपासून दूर जाण्याच्या मनस्थितीत आहेत. याचा फटका आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे.

माजी आमदार (स्व) नारायण पवार यांनी खेड-आळंदी विधानसभेचे सतत वीस वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 2004च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला मदत केली. त्यामुळे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर आप्पा समर्थकांची कायमच शिवसेनेशी जवळीक राहिली. 2009 चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यानंतरच्या  प्रत्येक मोठया निवडणुकीत आप्पा समर्थकांनी शिवसेनेला साथ दिली.  लोकसभेला तर एकमुखी मदत केली. तालुक्यात शिवसेनेला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

2009च्या विधानसभेसाठी आप्पांचे राजकीय अनुयायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना चाळीस हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. याच ठाकुरांनी तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या 'शब्दा'ची आठवण करून देत शिवसेना उपनेते संजय राऊत यांच्या समोरच त्यांना 'रस्ता' मोकळा करून देण्याचे आवाहन केले.

त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात सुध्दा ठाकूर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यामुळे दुखावलेल्या शिवसेनेतील काहींनी ठाकूर यांच्यावर कारवाई करावी, असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे धरला. या आग्रहामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन ठाकूर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. ठाकूर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे तालुक्यातील आप्पा समर्थक मात्र नाराज झाले आहेत. ठाकूर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांची झाली आहे.

निवडणुकीत शिवसेनेला मदत करणे, पक्षप्रमुखांच्या सभेला गर्दी करणे, शक्तिप्रदर्शन करणे, तिकीट मागणे हा काय गुन्हा आहे काय? चूक असेल तर समज देता आली असती, कारवाई करण्याची एवढी घाई का? कोणामुळे? असा सवाल आप्पा समर्थक करीत आहेत. 
माजी आमदार पवार यांना मानणारा तालुक्यात अजूनही मोठा वर्ग आहे. हा वर्ग ठाकूर यांच्या पाठीशी राहील, अशी तालुक्यातील सद्यपरिस्थिती आहे. निवडणुकीत मदत चालते, मग आमच्या माणसाने तिकीट मागितले तर बिघडले कुठं? असा सवाल या वर्गाकडून व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com