nangre patil on corporetors | Sarkarnama

नगरसेवकांनाही सोडणार नाही : नांगरे-पाटील 

सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

भाटवाडी प्रकरणी अधीक्षकांची दिशाभूल 

भाटवाडी प्रकरणातील पीडित मुलीचे कुटुंब मला भेटले. तिला त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाईची सूचना केली आहे. मुलीच्या तक्रारीच्या दृष्टिकोनातून तपास करण्यात येईल, असे श्री. नांगरे-पाटील म्हणाले. या प्रकरणात अधीक्षक दत्तात्रय शिंदेंनी मुलीचे कुटुंब भांडकुदळ असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले,""पोलिस अधीक्षकांची स्थानिक अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे.'' 

सांगली : सांगलीत गेल्या दोन महिन्यांत टोळीयुद्धातून दोन खून झाल्याची दखल घेत यात ज्यांची नावे असतील त्यांना कोणाला सोडणार नाही. तो कुणी नगरसेवक असो अथवा नसो, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

सांगली दौऱ्यावर आलेल्या श्री. नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने उपस्थित होते. सांगलीत दोन महिन्यांत टोळीयुद्धातून दोन खून झालेत. 

ते म्हणाले,""टोळीयुद्धावर वचक बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध कलमांखाली त्यांना तडीपार करण्याच्या कारवाई केल्यात. टोळ्यांना चालवणारे काहीजण आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. एका खुनात माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे. कुणीही असो त्यांना सोडणार नाही. गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढली जातील.'' 

कोल्हापूर परिक्षेत्रात दोन वर्षांत मटकेवाल्यांच्या टोळ्या हद्दपार करण्यात आल्यात. परिक्षेत्रात एकट्या सांगलीचे 21 टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव होते. त्यातील 19 टोळ्यांवर कारवाई झाली. उर्वरित कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण यांनी प्रत्येकी पाच टोळ्यांचे प्रस्ताव दिले होते, अशी माहिती श्री. नांगरे-पाटील यांनी दिली. यंदा 204 जणांवर 55 कलमांखाली तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. यात सांगलीतील 57 टोळ्यांचे प्रस्ताव आहेत. कलम 56 खाली 223 गुंडांवर हद्दपारी करण्यात आली. सांगलीचे 56 जण होते. यंदा हाच प्रस्तावित आकडा 63 आहे. गतवर्षी 26 टोळ्यांना मोका लावला. यात पाच टोळ्या सांगलीच्या होत्या, अशी माहितीही त्यांनी दिली. 

ते म्हणाले,"निर्भया पथकानेही चांगली कामगिरी केली. परिक्षेत्रातील 18 हजार 129 तरुणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 13 हजार 826 तरुणांचे समुपदेशन करण्यात आले. यात 4 हजार 739 सांगलीचे होते. मात्र ज्यांच्यात सुधारणा झाली नाही अशा 24 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.'' 
 

संबंधित लेख