nandkumar godase issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नंदकुमार गोडसे सोडणार आमदार जयकुमार गोरेंची साथ 

​आयाज मुल्ला 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

2009 मध्ये विधानसभा निवडणूकीत त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर समर्थन दिले होते.

वडूज (सातरा) : खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार गोडसे हे आमदार जयकुमार गोरे यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. या प्रकाराची खटाव तालुक्‍याच्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

खटाव पंचायत समितीत नंदकुमार गोडसे हे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले होते. आक्रमक स्वभाव व गणातील मजबूत संघटन कौशल्यामुळे त्यांचा चांगलाच बोलबाला होता. 2009 मध्ये विधानसभा निवडणूकीत त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर समर्थन दिले होते. त्यानंतर त्यांनी कायम आमदार गोरे व कॉंग्रेस पक्षाची पाठराखण केली. मात्र गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीपासून ते अलीप्तपणाने राहात आहेत. 

दीड वर्षापूर्वी झालेल्या वडुज नगरपंचायतीच्या निवडणूकीत तिकीट वाटप व अन्य कारणांमुळे त्यांच्यात नाराजी दिसून येऊ लागली. त्यामुळे त्यांनी निवडणूकीपासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे आमदार गोरे व नंदकुमार गोडसे यांच्यात काही काळ अबोला निर्माण झाला. मात्र काही कालावधीनंतर श्री. गोरे व नंदकुमार गोडसे यांच्यात गोडसेंच्या फार्म हाऊसवर बैठक होऊन पुनश्‍च मनोमिलन झाले. त्यावेळी दोघांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले होते. मात्र मनोमिलनाचे हे रोपण अधिक काळ टिकणार नसल्याचे दिसत आहे. 

महिन्याभरापूर्वी खटाव तालुका कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवड झाली. या निवडीत नंदकुमार गोडसे यांच्या नावावर साधी चर्चादेखील झाली नाही. याची खदखद त्यांच्या मनात आहे. याशिवाय नुकतीच कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा तालुक्‍यात आली होती. त्यावेळी लावलेल्या डिजीटल फ्लेक्‍सवर आमदार गोरे यांच्यासह तालुकाध्यक्ष व पंचायत समिती, नगरपंचायतीच्या आजी माजी सदस्यांची छायाचित्रे झळकली. मात्र, आमदार गोरे यांना उघडपणे साथ करणाऱ्या नंदकुमार गोडसेंचे छायाचित्र का वगळले, असा प्रश्‍न त्यांच्या समर्थकांतून उपस्थित होऊन त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. त्याचा परिणाम गोडसे गोरेंची साथ सोडणार, हे जवळपास नक्‍की झाले आहे. 

संबंधित लेख