nanded zp | Sarkarnama

उच्चशिक्षित महिलांचा नांदेड जिल्हा परिषदेत प्रवेश 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नांदेड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित महिला निवडून आल्या आहेत. त्यामध्ये डॉक्‍टर, अभियंता, प्राध्यापक महिलांचा समावेश असल्याने जिल्हा परिषदेचे सभागृह त्या गाजवण्याची शक्‍यता आहेत. 

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आणि पुरुषांबरोबर महिलांना देखील प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र राजकारणातील अधिकतर महिला केवळ नामधारी असतात असाच सर्वसाधारण समज आहे, कुटुंबातील पुरुषमंडळीच सर्व कारभार पाहतात असे बऱ्याचवेळा दिसून येते.

यावेळी मात्र हा समज पुसला जाण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित महिला निवडून आल्या आहेत. त्यामध्ये डॉक्‍टर, अभियंता, प्राध्यापक महिलांचा समावेश असल्याने जिल्हा परिषदेचे सभागृह त्या गाजवण्याची शक्‍यता आहेत. 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर या बिलोली तालुक्‍यातील रामतीर्थ गटातून निवडून आल्या असून त्या डॉक्‍टर आहेत. नायगाव तालुक्‍यातील मांजरम गटातील भाजपचे नेते राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांनी बीई मेकॅनिकलची पदवी घेतली आहे. आमदार सुभाष साबणे यांच्या सूनबाई भाग्यश्री विक्रम साबणे यांनी मुखेड तालुक्‍यातील एकलारा गटातून विजयी मिळवला असून त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदविका पूर्ण केली असून त्यांचे पदवीचे शिक्षण सुरू आहे.

नांदेड तालुक्‍यातील वाडी गटातून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या शीला निखाते एमबीए आहेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता चिखलीकर-देवरे यांनी बीए, बीएड केले आहे, त्या वडेपुरी गटातून विजयी झाल्या आहेत. बहाद्दरपुरा गटातून निवडून आलेल्या भाजपच्या संध्या धोंडगे आणि बारड गटातील कॉंग्रेसच्या सविता वारकड यांचेही बीए, बीएडपर्यंतचे शिक्षण झाले आहे. या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मंगाराणी अंबुलगेकर, मोनाली पाटील, संगीता जाधव या महिला सदस्या उच्चशिक्षित आहेत. राजकारणात केवळ नामधारी नाही तर कारभारी असल्याचे सिद्ध करत या महिला पदाधिकारी निश्‍चितपणे सभागृह गाजवतील असा अनेकांना विश्‍वास आहे. 

 

संबंधित लेख