मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिवसेनेच्या उडीने भाजपची कोंडी ! , नांदेडमध्ये भाजपविरोधात इतर पक्ष

 मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिवसेनेच्या उडीने भाजपची कोंडी ! , नांदेडमध्ये भाजपविरोधात इतर पक्ष

नांदेड : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनात सत्तेत असलेल्या शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्ताधारी भाजपच्या सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या मराठा आंदोलनातील या उडीने भाजपची मात्र कोंडी झाली आहे. 

संबंध राज्यभरात सकल मराठा आंदोलकांनी आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी रान पेटविले आहे. अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीमार केला तर काही ठिकाणी आंदोलकांनी प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली. दोन ठिकाणी आंदोलकांनी आत्महत्या केली. त्याचे तीव्र पडसाद आणखी उमटत आहेत. शहरात झालेल्या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. राज कॉर्नर भागात शिवसेनेचे पदाधिकारी रास्ता रोकोत उतरले. 

जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, प्रदीप जाधव, धोंडू पाटील, बाबुराव पाटील, प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार, डॉ. मनोज भंडारी, वत्सला पुयड, डॉ. निकीता चव्हाण, बालाजी कल्याणकर, बालासाहेब देशमुख, माधव पावडे, महेश खेडकर, साई विभूते, शैलेंद्र रावत यांच्यासह आदी पदाधिकारी सहभागी झाले. मात्र रास्ता रोको शांततेत सुरू असतांना पोलिसांनी रझाकारी अवतार धारण केला आणि ते शिवसैनिकांसह आंदोलकावर तुटून पडले. यात जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांच्यासह, काही महिला व कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. यात भुजंग पाटील जखमी झाले. 

यानंतर या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आणि आमदार सुभाष साबणे यांनी उडी घेतली. बुधवारी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर उड्डाणपुलावर रास्तारोको करण्यात आला. पोलिस अधिक्षक आणि मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि जिल्हाभरात दाखल झालेले आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी आमदारांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे आणि प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. शर्मा यांना निवेदन दिले. आंदोलकांवर यापुढे हल्ला झाल्यास शिवसेना खपवून घेणार नाही असा इशारा आमदारांनी यावेळी दिला. तसेच आमच्या संयमाचा बांध फुटत असून सरकारने यावर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे जाऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्यावतीने देण्यात आला. 

धुसफूस आता थेट रस्त्यावर 
एकीकडे मराठा आंदोलनावरून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इतर सर्व पक्ष व संघटना असे समीकरण निर्माण झाले असतानाच शिवसेनेसारखा सत्तेतला मित्रपक्ष थेट रस्त्यावर उतरल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. एरवीही या दोन पक्षांत अनेक प्रसंगावरून धूसफूस सुरू असते. मात्र ती लुटूपुटूची लढाई रस्त्यावर यायची नाही. आता नांदेडात ती थेट रस्त्यावर आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com