nanded politics | Sarkarnama

रस्ते आले महापालिकेकडे अन्‌ बार झाले मोकळे.... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला निर्णय अखेर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला असून शहर हद्दीतील रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्या संदर्भातील शासन निर्णय काल मंगळवारी झाला असून तो मिळाल्यानंतर "रस्ते आले महापालिकेकडे अन्‌ बार झाले मोकळे' अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

नांदेड : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला निर्णय अखेर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला असून शहर हद्दीतील रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्या संदर्भातील शासन निर्णय काल मंगळवारी झाला असून तो मिळाल्यानंतर "रस्ते आले महापालिकेकडे अन्‌ बार झाले मोकळे' अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

काहींनी "आनंद'ही व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नांदेड महापालिकेला मात्र आता या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करताना नाकीनऊ येणार हे नक्की आहे. कारण हे रस्ते म्हणजे एक प्रकारे पांढरा हत्तीच असल्याचे अनेकांनी यापूर्वी म्हटले होते तर काहींनी विरोधही केला होता. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारची दारू दुकाने ता. एक एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे नांदेड शहरातील अनेक दारूची दुकाने तसेच बार बंद झाले होते. दरम्यानच्या काळात नांदेड महापालिकेने अर्थसंकल्पाच्या दिवशी महापालिका हद्दीतील राज्य आणि राष्ट्रीय मार्ग महापालिकेकडे वर्ग करण्याचा ठराव घेण्यात आला आणि सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्या प्रस्तावावर सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी त्याचबरोबर विरोधक असलेले शिवसेना, भाजप, एमआयएमच्या गटनेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. सर्वांनी मिळून ठराव मंजूर केला. 

दरम्यानच्या काळात हा सगळा खटाटोप शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली दारूची दुकाने व बार सुरू करण्यासाठी होता, अशी चर्चा शहरात सुरू झाली. ता. एक एप्रिलपासून आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाली. आता तब्बल एक महिन्यानंतर ता. दोन मे रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय आला आणि त्यामध्ये नांदेड महापालिका हद्दीतील एकूण तीन रस्ते अवर्गीकृत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 

रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च नांदेड महापालिकेकडून करण्यात येईल व अवर्गीकृत केलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या देखभाल - दुरुस्तीसाठी शासनामार्फत कोणतेही अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही. या अटीच्या अधीन राहून सदर रस्त्यांना अवर्गीकृत करण्यास शासन मान्यता देत असल्याचे राज्याच्या नियोजन विभागाचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी शासन निर्णयात म्हटले आहे. 
 
खालील रस्ते आले नांदेड महापालिकेत... 
1. बजाज फंक्‍शन हॉल - छत्रपती चौक - तरोडा चौक - राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर - आनंदनगर चौक ते नागार्जुना हॉटेल 
2.  महात्मा फुले चौक ते वर्कशॉप कॉर्नर 
3.  महात्मा फुले चौक ते अण्णा भाऊ साठे चौक 
4.  डॉ. शंकरराव चव्हाण चौक - माळटेकडी गुरुद्वारा - नमस्कार चौक - महाराणा प्रताप चौक - बाफना - रेल्वे स्टेशन - देगलूर नाका - जुना गोदावरी पूल - वाजेगाव रस्ता 
5. जुना मोंढा - गोदावरी पूल - डॉ. आंबेडकर चौक 

संबंधित लेख