nanded politics | Sarkarnama

नांदेडला आठ पंचायत समित्यांचे सभापतिपद कॉंग्रेसकडे 

अभय कुळकजाईकर : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017


सभापती व उपसभापतीची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेकडे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष कोण होणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची असून कॉंग्रेससोबत जाणार की भाजप शिवसेनेसोबत जाणार? याबाबत अजूनही निर्णय झालेला
नाही. 

नांदेड : जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीमध्ये सर्वाधिक आठ ठिकाणचे सभापतिपद कॉंग्रेसने पटकाविले. भाजपने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली असून चार ठिकाणी पक्षाचे सभापती झाले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एका ठिकाणी सभापतिपद मिळाले. 

माहूर येथील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने तिथे सभापतिपदाची निवड झाली नाही. हदगाव येथे समसमान मते पडल्याने आणि अर्धापूरला उपसभापतिसाठी समसमान मते पडल्याने इश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. किनवट, मुखेडमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर दुसरीकडे कंधारमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप, रासप व अपक्षांनी सत्ता मिळविली. 

राज्यात सर्वत्र भारतीय जनता पक्षाची हवा जोरात असताना देखील नांदेड जिल्ह्यात ती थोपवून कॉंग्रेसची हवा कायम ठेवण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना यश मिळाले आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीतही कॉंग्रेसने यश मिळविले. आता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही कॉंग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा गड राखण्यात कॉंग्रेस आणि अशोक चव्हाण यशस्वी झाल्याचे चित्र आहे. 

पंचायत समिती सभापती : 
किनवट - कलावती राठोड (भाजप), हिमायतनगर - माया राठोड (कॉंग्रेस), हदगाव - सुनीता दवणे (कॉंग्रेस), अर्धापूर - मंगल स्वामी (कॉंग्रेस), नांदेड - सुखदेव जाधव (कॉंग्रेस), मुदखेड - शिवकांता गंड्रस (कॉग्रेस), भोकर - झिमाबाई चव्हाण (कॉंग्रेस), उमरी - शिरीष देशमुख गोरठेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), धर्माबाद - रत्नमाला कदम (भाजप), बिलोली - भाग्यश्री अनपलवार (भाजप), नायगाव - वंदना पवार (कॉंग्रेस). लोहा - सतीश पाटील उमरेकर (शिवसेना), कंधार - सत्यभामा देवकांबळे (राष्ट्रीय समाज पक्ष), मुखेड - अशोक पाटील (भाजप), देगलूर- शिवाजीराव देशमुख (कॉंग्रेस) 

पंचायत समिती उपसभापती: 
माहूर- नीलाबाई राठोड (कॉंग्रेस), किनवट - गजानन कोल्हे (शिवसेना), हिमायतनगर- खोबाजी वाळके (कॉंग्रेस), हदगाव - शेषराव कदम (शिवसेना), अर्धापूर - डॉ. लक्ष्मण इंगोले (अपक्ष), नांदेड - हसीना बेगम फहिम शेख (कॉंग्रेस), मुदखेड - आनंदा गादिलवाड (कॉंग्रेस), भोकर - सूर्यकांत बिल्लेवाड (अपक्ष), उमरी - पल्लवी मुंगल (राष्ट्रवादी कॉंग्रेस), धर्माबाद - चंद्रकांत वाघमारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बिलोली - दत्तराम बोधने (भाजप), नायगाव - सुलोचना हंबर्डे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), लोहा - इंदूबाई कदम (शिवसेना), कंधार - भीमराव जायभाये (अपक्ष), मुखेड - पंचफुला बाऱ्हाळे (भाजप), देगलूर - संजय वल्कले (कॉंग्रेस). 

 

संबंधित लेख