नांदेडला आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

Nanded Municipal Corporation
Nanded Municipal Corporation

नांदेड : नांदेड विधान परिषद, औरंगाबाद शिक्षक मतदार संघ, नगरपालिका आणि नगरपंचायत त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता नांदेड वाघाळा महापालिकेची येत्या आक्‍टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीनी महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सुरवात केली आहे. सत्ताधारी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न आपआपल्या परीने सुरू झाले असून या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधक एकत्र येणार की स्वबळावर निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड महापालिकेची स्थापना 26 मार्च 1997 रोजी झाली असून आतापर्यंत चार निवडणुका झाल्या आहेत. ऑक्‍टोबरमध्ये पाचवी निवडणूक होत आहे. महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता होती. त्यामुळे नांदेड महापालिकेतही शिवसेनेने बाजी मारत भाजप, अपक्ष आणि इतरांशी हात मिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली आणि शिवसेनेचे सुधाकर पांढरे प्रथम महापौर झाले. मात्र, त्यावेळी एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात सत्ता गेली तेव्हापासून काँग्रेसचेच महापौर झाले असून सध्या काँग्रेसच्या शैलजा स्वामी या महापौर आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी ते काठावरचे बहुमत होते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीची मदत घेत सत्ता स्थापन केली आणि पाच वर्षे सत्ता टिकवून ठेवण्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना यश आले.

आता मात्र परिस्थिती बदलली असून राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्याचबरोबर शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आतापर्यंत जिल्ह्यात फारसे पटलेले नाही. तसेच 'एमआयएम' ची महाराष्ट्रातील सुरवातदेखील नांदेडमधून झाली आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपला मागील निवडणुकीत फक्त दोन जागा होत्या तर शिवसेना पक्ष विरोधी बाकावर आहे. तसेच भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष आदींची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. 

आता प्रभागनिहाय निवडणुका होणार असून तीन सदस्यांचा प्रभाग होणार असल्यामुळे उमेदवारांची निवड देखील आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. साधारणतः एप्रिल महिन्यापासून निवडणुकीच्या तयारीला वेग येणार असून प्रभागनिहाय रचना जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर आक्षेप व हरकती मागविण्यात येतील व नंतर प्रभागनिहाय निवडणुकांची तयारी सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आपल्याला कोणत्या प्रभागातून निवडणुक लढविता येईल, याचा विचार विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक करू लागले आहेत. त्या दृष्टीने महापालिकेत सध्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. 

नांदेड महापालिकेतील पक्षीय बलाबल 

  • काँग्रेस - 41 
  • शिवसेना - 14 
  • एमआयएम - 11 
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 10 
  • भारतीय जनता पक्ष - 2 
  • इतर - 3

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com