Nanded farmers decided to go on strike | Sarkarnama

शेतकऱ्यांनी बैठकीतून घेतला संपावर जाण्याचा निर्णय - अशोक चव्हाणांच्या बालेकिल्यातील घटना

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वीज व पाणी मोफत देणे, आरोग्यसेवा व उच्चशिक्षण मोफत देणे, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे, शेतमाल आयातीवर बंदी घालून निर्यात वाढविणे आदी मागण्यांसंदर्भात ठराव करण्यात आले. या मागण्या मान्य झाल्या नाही तर कालबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला.

अर्धापूर - राज्याचे माजी मुखमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेड हा बालेकिल्ला आहे. ते नेहमी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत आता त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या भोकरच्या आमदार असून स्वतः अशोकराव नांदेड जिल्ह्याचे खासदार आहेत. त्यांच्यात बालेकिल्ल्यातील भोकर मतदारसंघात असलेल्या अर्धापूर तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्या अनेक पिढ्यांनी शेती केली, पण आमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही. आमच्या आजच्या परिस्थिती शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत ठरले आहे. यंदा पेरणीच करायची नाही आणि भाजीपाला, दूध, फळे शहराला पुरवायची नाहीत. आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी संपावर जावू. आता तरी, माय बाप शासनाने आमच्याकडे जरा लक्ष द्यावे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर संपावर जाण्याचा ठराव देखील एकमताने घेण्यात आला असून, यासाठी महिनाभर विविध माध्यमातून प्रचार करणार आहेत. तसेच शेतकरी क्रांती मोर्चा काढण्यात निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागांतील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असून, तसे ठराव करत आहेत. हे संपाचे लोण नांदेड जिल्ह्यात पोहोचले असून, पहिली बैठक अर्धापूर शहरात रविवारी घेण्यात आली. या बैठकीची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शेतकऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. शेती व शेतकऱ्यांसमोरील ज्वलंत प्रश्‍नावर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वीज व पाणी मोफत देणे, आरोग्यसेवा व उच्चशिक्षण मोफत देणे, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे, शेतमाल आयातीवर बंदी घालून निर्यात वाढविणे आदी मागण्यांसंदर्भात ठराव करण्यात आले. या मागण्या मान्य झाल्या नाही तर कालबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. यात ता. एक जून ते सात जून या काळात फळे व भाजीपाला विक्री बंदी, मृग नक्षत्रावर शेतकरी क्रांतिमोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर पेरण्या करण्यात येणार नाहीत, असे यावेळी ठरविण्यात आले. आला.  गावोगावी जाऊन ग्रामसभा, बैठका, चौकसभा यासह विविध माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी भाष्य केलेले नाही. मात्र येत्या काही दिवसात आपल्याला  सर्व पक्ष आणि नेत्यांचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून पाठिंबा मिळो अथवा न मिळो आंदोलन होणारच, असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.

संबंधित लेख