Nanded Election Ashok Chavan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

अखेर अशोक चव्हाणांनी दंड थोपटले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने सर्व सामर्थ्यासह अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नांदेड जिल्ह्यातील आणि राज्यातील विरोधक अशोक चव्हाणांचे साम्राज्य भुईसपाट करण्यासाठी एकवटले असताना अशोक चव्हाण यांनी अखेर आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

पुणे : नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने सर्व सामर्थ्यासह अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नांदेड जिल्ह्यातील आणि राज्यातील विरोधक अशोक चव्हाणांचे साम्राज्य भुईसपाट करण्यासाठी एकवटले असताना अशोक चव्हाण यांनी अखेर आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे शेवटच्या टप्प्यात सभा घेत अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील फ्लॅटचे प्रकरण उकरून काढले. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी खरेदी केलेल्या दोन फ्लॅटचे प्रकरण समोर आणले. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या बोलण्यातून भाजप अशोक चव्हाणांचा गड असलेली नांदेड महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्व मार्गांनी आणि साम दाम दंड भेदाचा वापर करणार हे स्पष्ट झाले आहे. नांदेडचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या वर्षभरात अशोक चव्हाण यांचे विरोधक भाजपच्या झेंड्याखाली गोळा करण्याचा धडाका लावला होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपने सोशल मिडियावर आणि प्रत्यक्ष प्रचारातही सर्व ताकद पणाला लावल्याने प्रथमच अशोक चव्हाण यांना मोठे आव्हान मिळाले आहे.

गेल्या दोन दिवसात अशोकरावांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह अनेक रथी महारथींना नांदेडच्या वार्डावार्डात फिरवून ही निवडणूक आपण किती गांभीर्याने घेत आहोत हे दाखवून दिले आहे. कागदोपत्री शिवसेनेचे; पण तनमनधनाने भाजपचे झालेले चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी नांदेडची सूत्रे हाती दिल्यापासूनच अशोकराव इरेला पडले आहेत.

नांदेड महापालिकेची तयारी अशोकरावांनी तीन महिन्यापूर्वीच सुरू केली होती. चांगला जनसंपर्क असलेले आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेले उमेदवार निवडून अशोकरावांनी भक्कम व्यूहरचना केली आहे. त्याबरोबरच काँग्रेसच्या मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर करू शकणाऱ्या एम.आय.एम. पक्षाची अशोकरावांनी नाकेबंदी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविलेले आहेत. एम.आय.एम. चे प्रमुख खासदार ओवेसी नांदेडमध्ये आठ दिवसांपासून तळ ठोकून बसले असले तरी त्यांना पूर्वीसारखा प्रभाव निर्माण करता आलेला नाही. नांदेड शहराताली सामाजिक व धार्मिक रचनेचा बारकाईने अभ्यास असलेल्या अशोकरावांनी उमेदवार निवडीत आपले कौशल्य दाखवून दिले आहे. मुस्लीम बहुल मतदार असलेल्या 81 पैकी 22 वॉर्डात 'एमआयएम' चा प्रभाव किती कमी होतो यावर काँग्रेसच्या किती जागा येणार याचे समीकरण बांधले गेले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अशोक चव्हाणांनी सर्व मार्गांचा अवलंब करून मुस्लीम बहुल मतदार असलेल्या वॉर्डात जोरदार मुसंडी मारली आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप प्रचार यंत्रणेची सूत्रे उघडपणे हाती घेत तिकीट वाटपात आणि महत्त्वाच्या बैठकीत अशोक चव्हाणांविषयी ममत्व असलेल्या भाजपमधील उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना खड्यासारखे दूर केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यात आणि कार्यकर्त्यांत एकवाक्‍यता आणि सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. पण काही ज्येष्ठ चिखलीकरांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले. अशोक चव्हाणांच्या विरुद्ध जंगजंग पछाडणारे निलंगेकर लातूरचे तर चिखलीकर कंधारचे. नांदेड शहराचे खाचखळगे आणि गल्लीबोळातील खड्डे अखेरच्या टप्प्यात या दोघांना उमजू लागले आहेत.

मात्र, नांदेड शहराचा तळहाताप्रमाणे अभ्यास असलेले अशोकराव चव्हाण यांनी चव्हाण कुटुंबाची गेल्या साठ-पासष्ट वर्षातील जनसंपर्काची पुण्याई पणाला लावली आहे. घरोघरी मतदारांशी असलेले चांगले संबंध आणि सुखा-दुःखाला धावून जायच्या वृत्तीमुळे मतदारांत अजूनही अशोकराव चव्हाण यांची प्रतिमा चांगली आहे.

भाजपने सोशल मिडियावरील लढाईमध्ये काँग्रेसवर आघाडी घेतली आहे. व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा विविध माध्यमातून भाजपने अतिशय योजनबद्धपणे काँग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष केले आहे. अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळेच गुरुता-गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने त्यावेळी केंद्र आणि राज्यसरकारकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी नांदेड शहर आणि परिसराच्या विकासासाठी आला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतरही अशोकरावांनी नांदेड शहर जिल्ह्यावर विकास योजनांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. मात्र, या विकासगंगेत अशोक चव्हाण समर्थक डी. पी. सावंत आणि मंडळींनी जे हात धुऊन घेतले त्यावर भाजपने तोफा डागल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात काँग्रेस बॅकफुटवर गेली होती. मात्र, अशोक चव्हाणांनी विकासपुरुष अशी आपली प्रतिमा सोशल मिडियातील कॅम्पेनवरून यशस्वीपणे उभी केली आहे. मात्र सोशल मिडियावर काँग्रेस आणि भाजपने परस्परविरोधी पोस्ट हिरिरीने टाकल्याने नागरिकांची मोठीच करमणूक झाली आहे.

भाजपने आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची मोठ्या प्रमाणात फोडाफोड केली आहे. जिल्ह्यातील प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे संतापलेले आहेत. चिखलीकरांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक फोडून भाजपमध्ये नेल्याने आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत काँग्रेस ऐवजी भाजपवरच तोफ डागलेली दिसली. एक तर आपला उमेदवार निवडून यावा. नाही तर इतर कोणी आले तर चालेल पण भाजप येऊ नये अशा इराद्याने शिवसेना नांदेडमध्ये कामाला लागलेली आहे. शिवसेना भाजपच्या संघर्षाचा लाभ अशोक चव्हाणांनी उठवला नाही तरच आश्‍चर्य मानावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रभाव नांदेडमध्ये फारसा जाणवत नाही. अशोक चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप इतकी आक्रमक भूमिका घेतलेली नाही. सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील असे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक नांदेडला प्रचारासाठी आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढत असला तरी ही लढाई संघटनेतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा हेतू अधिक आहे. याचा लाभ अशोक चव्हाण आपल्यापरीने करून घेत आहेत.

पैशाचा महापूर
नांदेड शहर परिसरातील धाबे आणि हॉटेल्स राजकीय कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत आहेत. मतदानाला 48 तास उरलेले असताना मतदारांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी काँग्रेसच्या बरोबरीने भाजपचेही स्थानिक नेते सरसावले आहेत. मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी एका प्रभागातील चारही उमेदवार एकत्रितपणे एका मतासाठी एक ते दीड हजार 'सेकंद' खर्च करून मतदारांचे 'उद्‌बोधन' करीत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसत आहेत. मतदानाच्या वेळेपर्यंत यामध्ये दुपट्टीने वाढ होण्याची शक्‍यता आणि अपेक्षा काही मतदार व्यक्त करीत आहेत. मात्र चार नगरसेवक पदासाठीच्या एक-एक प्रभागात वीस ते पंचवीस हजार मतदार असल्याने प्रत्येक मतदाराचे मन परिवर्तन करण्यास उमेदवारांना वेळ पुरत नाही. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांच्या मदतीला मुबलक वेळ असलेले कार्यकर्ते पाठवले असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

संबंधित लेख