Nanded agitation : food distributed to stranded commuters | Sarkarnama

नांदेडच्या आंदोलनात घडले माणुसकीचे दर्शन 

सरकारनामा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

रास्तारोको आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या वाहनचालकांना तसेच इतर प्रवाशांना आंदोलनकर्त्यांसोबत इतरांनी देखील मदतीचा हात पुढे करत चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली. 

नांदेड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींसाठी देखील मदतीचा हात देत असताना माणुसकीचे दर्शनही पहायला मिळाले. रास्ता रोको केल्यानंतर अचानक रुग्णवाहिका आली तर त्यातून तातडीने मार्ग काढत मदत करण्यासाठी आंदोलनकर्ते पुढे येत होते . 

रास्तारोको आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या वाहनचालकांना तसेच इतर प्रवाशांना आंदोलनकर्त्यांसोबत इतरांनी देखील मदतीचा हात पुढे करत चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली. 

मांजरम (ता. नायगाव) येथे आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भोजनाची सोय करण्यात आली होती. नायगाव येथे आमदार वसंत चव्हाण यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आंदोलन कर्त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कुंटूर फाट्यावर परिसरातील मराठा तरूणांनी एकत्र येऊन पदरमोड करून चक्काजाम आंदोलनामुळे अडकून पडलेल्या ट्रक चालकांना जेवणाची सोय करून आंदोलनात ही माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 

 देगाव (ता. अर्धापूर) येथे किर्तन, भजन आणि पोवाडा सादर करुन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणीही खिचडी आणि चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. अर्धापूर येथे वाहनांच्या रांगा लागल्या असल्या तरी वाहनचालकांना तसेच इतर प्रवाशांना चहा, नाष्टा, भोजनाची केली व्यवस्था करण्यात आली. 

जांब (ता. मुखेड) येथील आंदोलनात मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शवत मुंडन आंदोलन केले. मालेगाव (ता. अर्धापूर) रस्त्यावर तसेच अर्धापूरजवळील दाभड येथे रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी रुग्णवाहिका आल्यानंतर तत्काळ रस्ता मोकळा करुन दिला. तसेच दगडापूर (ता. बिलोली) येथे आंदोलकांनी उपचारासाठी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता तत्काळ खुला करुन सहकार्य केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख